सैराट फेम अरबाज शेखचे सोलापूरच्या हॉस्पिटलवर गंभीर आरोप; 40 हजारांची औषधं हॉस्पिटलच्या मेडिकलमधून घ्यायला लावली

सैराट फेम अरबाज शेखचे सोलापूरच्या हॉस्पिटलवर गंभीर आरोप; 40 हजारांची औषधं हॉस्पिटलच्या  मेडिकलमधून घ्यायला लावली

मुंबई (प्रतिनिधी) : 'सैराट' चित्रपटातील सल्या या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता अरबाज शेख पुन्हा चर्चेत आला आहे. यावेळी कारण आहे त्याने सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयावर केलेले गंभीर आरोप. वडिलांच्या उपचारादरम्यान रुग्णालयाने स्वतःच्या मेडिकलमधूनच औषधं खरेदी करण्यास भाग पाडल्याचा दावा अरबाजने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये केला होता. मात्र, नंतर हा व्हिडिओ त्याने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवला.

अरबाजच्या म्हणण्यानुसार, त्याच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज आणि हृदयविकाराच्या त्रासानंतर सोलापूरमधील नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सुरुवातीला 10 हजार रुपयांचे डिपॉझिट भरल्यानंतर औषधांची यादी देण्यात आली. बाहेरून औषधं आणण्याची परवानगी मागितल्यावर ती नाकारण्यात आली आणि रुग्णालयातील मेडिकलमधूनच औषधं घेण्यास सांगण्यात आल्याचा आरोप त्याने केला. या औषधांसाठी सुमारे 40 हजार रुपये खर्च झाल्याचेही त्याने म्हटले. हीच औषधं बाहेरच्या मेडिकलमध्ये जवळपास अर्ध्या किमतीत मिळाली असती, असा दावाही त्याने केला.

या आरोपांदरम्यान अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नुकतेच स्पष्ट केले होते की, रुग्णालये रुग्णांना त्यांच्या स्वतःच्या फार्मसीमधूनच औषधं खरेदी करण्यास सक्ती करू शकत नाहीत. औषधं कुठून घ्यायची हा निर्णय रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा अधिकार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता.

दरम्यान, नोबल हॉस्पिटल प्रशासनाने अरबाज शेखचे सर्व आरोप फेटाळले आहेत. रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अमजदअली सय्यद यांनी सांगितले की, अरबाजचे वडील अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झाले होते आणि आवश्यक तीच औषधं देण्यात आली. रुग्णालयाच्या मेडिकलमधूनच औषधं घेण्याची कोणतीही सक्ती करण्यात आलेली नसल्याचा दावा त्यांनी केला.

अरबाज शेखने आरोप करणारा व्हिडिओ नंतर सोशल मीडियावरून हटवल्यामुळे तो व्हिडिओ का डिलीट करण्यात आला, याबाबत मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडते आणि संबंधित यंत्रणा याची दखल घेते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.