गोकुळ निवडणूक १२८ दूध संस्थांच्या अवसायनाचा पेच आता २१ जुलैला सुटणार
कोल्हापूर/प्रतिनिधी :अंतिम अवसायनाचा (लिक्विडेशन) आदेश दिलेल्या १२८ दूध संस्थांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांनी या प्रकरणात दूध संस्था आणि शासनाच्या दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर, पुढील सुनावणी आता २१ जुलै रोजी घेण्याचे निश्चित केले आहे. तोपर्यंत सहायक निबंधकांच्या अवसायनाच्या आदेशाला दिलेली स्थगिती न्यायालयाने कायम ठेवली आहे.

सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी जिल्ह्यातील एकूण १,३२० दूध संस्थांपैकी ६४४ संस्थांचा अवसायनाचा आदेश अंतिम केला होता. या निर्णयाविरोधात भुदरगड तालुक्यातील फणसवाडी येथील हनुमान दूध संस्थेने सर्वप्रथम मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. न्यायालयाने यापूर्वी या कारवाईला स्थगिती देत पुढील तारीख ३ ऑगस्ट निश्चित केली होती.
दरम्यान, अवसायनाच्या कारवाईला सामोरे जाणाऱ्या आणखी १२८ दूध संस्थांनीही न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे न्यायालयाने फणसवाडीच्या हनुमान दूध संस्थेसह या सर्व १२८ संस्थांची एकत्रित सुनावणी बुधवारी (दि. ८) पार पाडली.
सुनावणी दरम्यान, दूध संस्थांच्या वतीने संचालक मंडळाला थेट दावा दाखल करण्याचा अधिकार आहे की नाही, यावर चर्चा झाली. शासनाच्या वतीने ॲड. सतीश तळेकर यांनी, तर दूध संस्थांच्या वतीने ॲड. एस. एस. पटवर्धन यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने संबंधित दूध संस्थांना दिलासा देत पुढील सुनावणी २१ जुलै रोजी ठेवली आहे. यामुळे आता सर्वांचे लक्ष २१ जुलैला होणाऱ्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.




