सुप्रीम कोर्ट खिशात आहे का? अमित शाह-शिंदे भेटीवरून संजय राऊतांचा घणाघात; शिंदे गटात अस्वस्थता असल्याचा दावा
मुंबई: शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' चिन्हाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू असतानाच, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात वारंवार होणाऱ्या भेटींवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी थेट गृहमंत्री शाह आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

रविवारी (३० ऑगस्ट) प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी या दोन नेत्यांमधील संभाषणाचा हवाला देत मोठा दावा केला. राऊत म्हणाले, "काल झालेल्या भेटीत एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना 'आमचे आमदार आणि मंत्री सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य निर्णयामुळे प्रचंड घाबरले आणि अस्वस्थ झाले आहेत' असे सांगितले. त्यावर शाह यांनी 'मी आहे, अजिबात काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल' असे आश्वासन दिले."
"गेल्या महिन्यात संसदेच्या अधिवेशनादरम्यानही शिंदे गटाच्या खासदारांनी अमित शाह यांची भेट घेऊन हीच चिंता व्यक्त केली होती. त्यावेळीही 'सर्व काही माझ्यावर सोडा' असे शाह यांनी सांगितले होते," असा घणाघाती आरोप राऊत यांनी केला.
पुढे बोलताना राऊत यांनी न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेवर प्रश्न उपस्थित केले. "देशाचे सर्वोच्च न्यायालय यांच्या खिशात आहे का? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अशा प्रकारे उघडपणे भाष्य केले जात असल्यामुळे देशातील न्यायव्यवस्थेवरील सामान्य जनतेचा विश्वास उडत चालला आहे. देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे हे सर्वजण न्यायालयाच्या निकालाबाबत एकाच सुरात बोलत आहेत. हा सर्व प्रकार आता थेट न्यायालयाच्याच निदर्शनास आणून देणे हे आमचे कर्तव्य आहे," असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.




