शिंदे साहेबांना वाईट वाटलंय...; बच्चू कडूंचा मनोज जरांगेंना फोन; परभणीतील शेतकरी मेळाव्यावरून तणाव वाढला

शिंदे साहेबांना वाईट वाटलंय...; बच्चू कडूंचा मनोज जरांगेंना फोन; परभणीतील शेतकरी मेळाव्यावरून तणाव वाढला

परभणी: शिवसेना खासदार बंडू जाधव यांनी परभणीत आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. हा कार्यक्रम तत्काळ रद्द करावा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणीला येऊ नये, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली होती. मात्र, जरांगे पाटलांचा विरोध झुगारून बंडू जाधव मेळावा घेण्यावर ठाम राहिले. दरम्यान, एकनाथ शिंदे मुंबईतून नांदेडच्या दिशेने रवाना झाले असून, तेथून ते परभणीकडे जाणार आहेत.

 

या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या माध्यमातून मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. बच्चू कडू यांनी जरांगे यांना फोन करून सांगितले, "मला शिंदे साहेबांचा फोन आला होता. ते म्हणाले की जरांगे पाटील तुमचे ऐकतात का ते बघा. घडलेल्या प्रकारामुळे शिंदे साहेबांना वाईट वाटले आहे. हा मेळावा मराठ्यांच्या विरोधात नाही. बंडू जाधव यांनी वेगळ्या उद्देशाने कार्यक्रम घेतला असेल, तर मला कल्पना नाही."

मात्र, या संभाषणात मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत कार्यक्रम रद्द करण्याची मागणी लावून धरली. जरांगे म्हणाले, "मी तुमचा शब्द मानतो, पण हा कार्यक्रम तत्काळ रद्द करा. बंडू जाधव केवळ खुन्नस काढण्यासाठी हा मेळावा घेत आहेत. मराठा समाजाचे मन दुखावून असे कार्यक्रम घेणे योग्य नाही. मराठ्यांनी जाधव यांचे काय बिघडवले आहे? त्यांनी विनाकारण या प्रकरणात पडू नये."

 जरांगे यांनी बंडू जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत, "एकनाथ शिंदेंकडून काही खोके मिळाल्याशिवाय ते शांत बसणार नाहीत," असा घणाघाती आरोपही केला. आता एकनाथ शिंदे नांदेडमार्गे परभणीत पोहोचल्यानंतर मराठा आंदोलकांची पुढील भूमिका काय असणार आणि तेथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.