डीकेटीईच्या तीन विद्यार्थिनींची 'अॅलेक्स मशिनटूल्स' कंपनीत निवड; उत्तम पॅकेजवर झाली नियुक्ती
इचलकरंजी : येथील प्रसिद्ध डीकेटीई संस्थेच्या मेकॅनिकल विभागातील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील वैष्णवी आनंदाचे, प्रणाली सावंत आणि सोनाली लोटके या तीन विद्यार्थिनींची 'अॅलेक्स मशिनटूल्स' या नामांकित कंपनीमध्ये उत्तम पॅकेजवर निवड झाली आहे. विद्यार्थिनींच्या या यशामुळे डीकेटीई संस्थेची उद्योगाभिमुख शिक्षणपद्धती पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

अॅलेक्स मशीन टूल्स ही १९६४ पासून कार्यरत असून, भारतातील उच्च अचूकता पृष्ठभाग ग्राइंडिंग मशीनच्या निर्मितीतील आघाडीची कंपनी आहे. ही कंपनी ऑटोमोबाईल्स, एरोस्पेस, बेअरिंग, टूल अँड डाय, इलेक्ट्रॉनिक्स आणि मशीन बिल्डिंग यांसारख्या विविध उद्योगांसाठी आधुनिक सीएनसी तंत्रज्ञानावर आधारित अचूक ग्राइंडिंग सोल्यूशन्स उपलब्ध करून देते.
पुणे येथे दोन महिन्यांचे विशेष प्रशिक्षण: निवड झालेल्या तिन्ही विद्यार्थिनींनी 'इंडियन मशिन टूल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन' (पुणे) येथे दोन महिन्यांचे विशेष प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. या प्रशिक्षणादरम्यान त्यांनी आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, मशिन टूल्स, अचूक अभियांत्रिकी आणि औद्योगिक उत्पादन प्रक्रियांचे प्रत्यक्ष ज्ञान आत्मसात केले. मेकॅनिकल विभागातील माजी विद्यार्थी आणि उद्योगांमधील उत्तम संबंधांमुळे संस्थेतील प्लेसमेंट प्रक्रिया अधिक बळकट होत आहे.
संस्थेकडून अभिनंदन: विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टींनी त्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थिनींना संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. व्ही. आर. नाईक, टीपीओ जी. एस. जोशी आणि कोऑर्डिनेटर डॉ. बी. बी. कबनुरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.




