जातनिहाय जनगणनेसाठी १ ते ७ ऑगस्ट दरम्यान 'संघर्ष यात्रा'; कोल्हापूर ते जालना आयोजन
कोल्हापूर/प्रतिनिधी : देशात जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी संसद अधिवेशनादरम्यान सरकारवर दबाव वाढवण्याच्या उद्देशाने ओबीसी जनमोर्चाच्या वतीने १ ते ७ ऑगस्ट दरम्यान भव्य 'संघर्ष यात्रा' आयोजित करण्यात आली आहे. आरक्षणाची जन्मभूमी असलेल्या लोकराजा राजर्षी शाहू छत्रपतींच्या कोल्हापूर नगरीतून या यात्रेची सुरुवात होईल आणि जालना जिल्ह्यातील माजलगाव येथील 'मंडल स्तंभ' येथे यात्रेचा समारोप होईल, अशी माहिती ओबीसी जनमोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस दिगंबर लोहार यांनी दिली.

कोल्हापुरातील चौंडेश्वरी मंदिर सभागृह (देवांग कोष्टी समाज कार्यालय) येथे ओबीसी जनमोर्चाची विशेष बैठक पार पडली. ओबीसी जनमोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली ही संघर्ष यात्रा निघणार आहे. यामध्ये मोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, आगरी समाजाचे दशरथ पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील तमाम ओबीसी नेते आणि बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
दिगंबर लोहार यांनी या संघर्ष यात्रेच्या मार्गाची माहिती देताना सांगितले की, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या यात्रेचे अभूतपूर्व स्वागत केले जाईल. १ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथील शाहू समाधी स्थळावरून हजारो ओबीसी महिला, माता-भगिनी आणि बांधवांच्या उपस्थितीत या यात्रेचे नियोजन केले जात आहे.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवांग कोष्टी समाजाचे अध्यक्ष मोहन हजारे होते. या बैठकीत जिल्हाध्यक्ष एकनाथ कुंभार, सचिन सुतार, अनिल खडके, संजय सुतार, संजय काटकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी ज्ञानेश्वर सुतार यांनी उपस्थितांचे आभार मानले. या बैठकीला जिल्ह्यातील विविध ओबीसी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




