पुण्यात पावसाचा हाहाकार! खडकवासला धरण ओव्हरफ्लो; मुठा नदीला पूर, भिडे पूल पाण्याखाली

पुण्यात पावसाचा हाहाकार! खडकवासला धरण ओव्हरफ्लो; मुठा नदीला पूर, भिडे पूल पाण्याखाली

पुणे (प्रतिनिधी) : राज्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून, पुण्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. घाटमाथ्यावर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरण शंभर टक्के भरले असून, धरणातून मुठा नदीपात्रात सुमारे 28 हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.या मोठ्या विसर्गामुळे मुठा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढली असून नदीकाठचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पुण्यातील प्रसिद्ध भिडे पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून, नदीपात्रातील मेट्रोच्या खांबांनाही पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. नदीकाठावर उभी असलेली अनेक वाहने पाण्यात बुडाली असून, दोन पोकलेन मशिनचा केवळ वरचा भागच दिसत आहे.

परिस्थितीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदीपात्र आणि पूरग्रस्त भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, वाढत्या पाणीपातळीच्या पार्श्वभूमीवर महापौर मंजुषा नागपुरे यांनी राजपूत नगर, पुलाचीवाडी, एकता नगरी आणि निंबजनगर परिसराची पाहणी केली. तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनीही एकता नगर परिसराला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.

खडकवासला धरणातून झालेल्या विसर्गामुळे एकता नगर परिसरात पूरस्थिती निर्माण झाली असून, या भागात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी विविध पर्यायांवर काम सुरू असल्याचे दिवटे यांनी सांगितले. आवश्यक असल्यास नागरिकांच्या स्थलांतराचाही पर्याय विचाराधीन असल्याची माहिती त्यांनी दिली.पूरग्रस्त नागरिकांना शक्य ती सर्व मदत करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले असून, वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

दुसरीकडे, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीतही इंद्रायणी नदीला पूर आला असून नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक सखल भागांत पाणी शिरून नुकसान झाले आहे.दरम्यान, खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये मिळून सुमारे 14 टीएमसी, म्हणजेच जवळपास 48 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मात्र, नदीतील वाढत्या पाणीपातळीमुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.