नाशिक मनपाच्या विशेष महासभेत अभूतपूर्व गोंधळ; ठाकरे गट, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक डोक्याला बँडेज बांधून आले अन्..
मुंबई (प्रतिनिधी) : नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे, सिंहस्थ कुंभमेळ्याची रखडलेली कामे आणि एमएनजीएलकडून खोदण्यात आलेल्या रस्त्यांच्या प्रश्नावरून नाशिक महानगरपालिकेची विशेष महासभा आज चांगलीच तापली. महासभेच्या सुरुवातीलाच सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. खड्ड्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षातील नगरसेवकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.

ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी हाताला आणि डोक्याला बँडेज बांधून, तर काही नगरसेवकांनी व्हीलचेअरवर बसून महापालिकेत प्रवेश केला. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रुग्णवाहिकेतून महापालिकेत दाखल झाले. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिक अपघातग्रस्त होत असल्याचा संदेश देत या नगरसेवकांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला.
नाशिक शहरातील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त असून, रस्ते अपघातांमध्ये आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक नागरिक जखमी झाल्याने या प्रश्नावर तातडीने विशेष महासभा बोलावण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. त्यानुसार आज सकाळी 11.30 वाजता विशेष महासभेला सुरुवात झाली. महासभेत सिंहस्थ कुंभमेळ्याची अर्धवट कामे, शहरातील खड्डे, एमएनजीएलकडून खोदण्यात आलेले रस्ते आणि विविध विकासकामांचा दर्जा या मुद्द्यांवर प्रशासनाला धारेवर धरण्याची तयारी विरोधकांनी केली.
महासभेला सुरुवात होण्यापूर्वीच ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी डोक्याला आणि हाताला बँडेज बांधून महापालिकेत प्रवेश केला. काही नगरसेवक व्हीलचेअरवर बसून आले. शहरातील रस्त्यांची अवस्था गंभीर झाली असून नागरिकांना अपघातांचा सामना करावा लागत असल्याचे सांगत त्यांनी स्वतःला ‘अपघातग्रस्त’ दाखवत प्रशासनाचा निषेध केला. ठाकरे गटाचे गटनेते केशव पोरजे यांनी नाशिकमध्ये चार मंत्री असतानाही शहरातील परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतले, मात्र शहराची अवस्था काय झाली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रुग्णवाहिकेतून महापालिकेच्या आवारात दाखल झाले. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचा संदेश देत त्यांनी हे प्रतीकात्मक आंदोलन केले. महासभेत खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र या मदतीच्या निर्णयाला सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाकडून विरोध होत असल्याचे विरोधकांकडून सांगण्यात आले.
विशेष महासभेला सुरुवात होताच सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. विरोधी नगरसेवकांनी खड्ड्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला जाब विचारण्यास सुरुवात केली. महासभेत मृतांना श्रद्धांजलीचा प्रस्ताव सुरू असतानाच सभागृहाबाहेर आणि त्यानंतर सभागृहात विरोधकांकडून आंदोलन करण्यात आले. ठाकरे गटाचे नगरसेवक महापौरांच्या आसनव्यवस्थेजवळ पोहोचल्याने परिस्थिती आणखी तापली.
अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे हे महासभेत बोलत असताना ठाकरे गटाच्या नगरसेवकांकडून आंदोलन करण्यात आले. शहाणे यांनी नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावर न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांसंदर्भात महापौरांनी ‘नौटंकी’ असा शब्दप्रयोग केल्याने मुकेश शहाणे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे महासभेतील वातावरण आणखी तापले.
शहरातील रस्त्यांची दुरवस्था, निकृष्ट दर्जाची कामे आणि खड्ड्यांमुळे होणारे अपघात यासाठी जबाबदार कंत्राटदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी केली. अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना ठोस आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही विरोधकांनी केली आहे. प्रशासनाने तातडीने रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत आणि रखडलेली विकासकामे वेगाने पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, विशेष महासभेच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. महासभेत खड्डे, कुंभमेळ्याची कामे आणि रस्त्यांच्या प्रश्नावरून वातावरण तापण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा रक्षक आणि पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, येत्या आठ ते दहा दिवसांत महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशाराही ठाकरे गटाच्या नगरसेवकांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या महासभेनंतरही नाशिकमधील खड्ड्यांचा प्रश्न राजकीयदृष्ट्या आणखी तापण्याची शक्यता आहे.




