राजेंद्र पवार आंदोलनस्थळी भावूक; सरकारवर केली जोरदार टीका

राजेंद्र पवार आंदोलनस्थळी भावूक; सरकारवर केली जोरदार टीका

मुंबई (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी १२ जूनपासून पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस असून, कर्जमाफीतील अटी-शर्ती हटवून सर्व पात्र शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी पुन्हा स्पष्ट केली आहे.

आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित असून रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सहभाग नोंदवला आहे. माध्यमांशी संवाद साधताना राजेंद्र पवार म्हणाले, "रोहितने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्याच्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी मी येथे उपस्थित आहे."बाप म्हणून काय वाटतं?" या प्रश्नावर त्यांनी भावनिक प्रतिक्रिया देताना सांगितले की, "मी त्याचा जन्मदाता असलो तरी त्याला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलं आहे. त्यामुळे शेतकरी हाच त्याचा खरा पालक आहे."

कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, "माझं किंवा रोहितचं वैयक्तिक काहीही हितसंबंध नाहीत. हे आंदोलन सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे." तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हायचं की घरात बसून राहायचं, याचा निर्णय स्वतः घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.दरम्यान, रोहित पवार यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार कोणती भूमिका घेते, याकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.