आता पालकांचा SIR तपशील देणे बंधनकारक, निवडणूक आयोगाने का घेतला हा निर्णय?
मुंबई (प्रतिनिधी) : मतदार यादीत नाव नोंदवणाऱ्या नवीन मतदारांसाठी निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे. आता प्रथमच मतदार म्हणून नोंदणी करणाऱ्या प्रत्येक अर्जदाराला त्यांच्या पालकांशी संबंधित SIR (Special Intensive Revision) घोषणापत्राचा तपशील अर्जासोबत द्यावा लागणार आहे.

हा नियम फॉर्म 6 द्वारे नाव नोंदवणाऱ्या सर्व नवीन मतदारांना लागू असेल. आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जून 2025 मध्ये बिहारमध्ये सुरू करण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेदरम्यान ही अट प्रथम लागू करण्यात आली होती. त्यानंतर नवीन मतदारांकडून हे घोषणापत्र घेणे आवश्यक करण्यात आले.
महत्त्वाची बाब म्हणजे, फॉर्म 6 मध्ये कोणताही औपचारिक बदल करण्यात आलेला नाही. मात्र, निवडणूक आयोगाने स्वतंत्र सूचना जारी करून पालकांच्या SIR तपशीलाची माहिती देणे अनिवार्य केले आहे.
दरम्यान, SIR प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांनाही निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, ही प्रक्रिया पूर्णपणे घटनात्मक, पारदर्शक आणि निष्पक्ष आहे. यामागचा उद्देश केवळ पात्र भारतीय नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे आणि अपात्र नावे वगळणे हा आहे. कोणत्याही व्यक्तीचे नाव यादीतून वगळले गेल्यास, त्याला संबंधित निर्णयाला आव्हान देण्याची संधीही दिली जाते.
SIR म्हणजे "स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन" अर्थात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरावलोकन. या प्रक्रियेद्वारे मतदार यादी अद्ययावत केली जाते आणि त्यामध्ये फक्त पात्र मतदारांचा समावेश असल्याची खात्री केली जाते.
विशेष म्हणजे, देशात जवळपास 21 वर्षांनंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर SIR मोहीम राबवली जात आहे. यापूर्वी 2002 ते 2004 या कालावधीत अशी व्यापक पुनरीक्षण मोहीम पार पडली होती. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, देशात ही SIR प्रक्रिया आठव्यांदा राबवली जात आहे.




