सोनम वांगचूक यांच्या उपोषणावरून मोदी सरकारवर संजय राऊतांचा हल्लाबोल
मुंबई (प्रतिनिधी) : सोनम वांगचूक यांच्या सुरू असलेल्या उपोषणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. वांगचूक यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करत, सरकार त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

राऊत म्हणाले की, आंदोलन करणाऱ्यांशी संवाद साधण्याऐवजी सरकार शांत बसले आहे. त्यांनी अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा संदर्भ देत, तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने सातत्याने संवाद साधला होता, अशी आठवण करून दिली. आज मात्र केंद्र सरकारकडून तशी कोणतीही हालचाल दिसत नसल्याचे त्यांनी म्हटले.
याचवेळी त्यांनी NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरही भाष्य करत, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलनाचा उल्लेख केला.
लाडकी बहीण योजनेवर बोलताना राऊत यांनी सरकारवर आश्वासनपूर्तीबाबत प्रश्न उपस्थित केले. निवडणुकीत जाहीर केलेल्या आर्थिक मदतीची अंमलबजावणी का होत नाही, असा सवाल त्यांनी केला.
शरद पवार यांच्याविषयी बोलताना, ते सर्व पक्षांशी संवाद ठेवणारे आणि महाविकास आघाडीचे मार्गदर्शक असल्याचे राऊत म्हणाले. पवार वेगळी भूमिका घेतील, अशी शक्यता नसल्याचाही त्यांनी दावा केला.
राज्याच्या राजकारणावर भाष्य करताना, देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेल्यास चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य करत राऊत यांनी मिश्कील टिप्पणी केली. तसेच, "बावनकुळे चांगले माणूस आहेत, त्यांना विनाकारण अडचणीत आणू नका," असेही ते म्हणाले.




