ओमराजेंच्या पक्षांतरावरून राजकारण तापलं; सचिन अहिरांची ठाम बाजू, विकासासाठी घेतलेल्या निर्णयाचं समर्थन
मुंबई (प्रतिनिधी) : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशानंतर राज्यातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू असतानाच विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी ओमराजेंच्या निर्णयाचं जोरदार समर्थन केलं आहे.

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेल्या सचिन अहिर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, "ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका करणाऱ्यांनी आधी त्यांचा संघर्ष समजून घ्यावा," असा सल्ला दिला. त्यांनी सांगितलं की, तरुण खासदारांची फळी पक्षासाठी बळकटी ठरेल आणि लोकांच्या विकासकामांना गती मिळेल. "जोपर्यंत एखादा नेता आपल्या पक्षात असतो, तोपर्यंत तो चांगला आणि पक्ष बदलताच तो वाईट ठरतो, ही भूमिका योग्य नाही," असा सवालही त्यांनी विरोधकांना केला.
दरम्यान, पक्षप्रवेशानंतर प्रथमच मतदारसंघात पोहोचलेल्या ओमराजे निंबाळकर यांनी आपला निर्णय वैयक्तिक स्वार्थासाठी नसून मतदारसंघाच्या विकासासाठी घेतल्याचं स्पष्ट केलं. विरोधी पक्षात राहिल्यामुळे शेतकरी, वीज, सिंचन आणि विकासकामांसाठी आवश्यक निधी मिळवताना मोठ्या अडचणी येत असल्याचं त्यांनी सांगितलं. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पराभवाचाही उल्लेख करत, जनभावना आणि विकासाच्या गरजा लक्षात घेऊन सत्तेत सहभागी झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
ईडी किंवा बँक घोटाळ्याच्या दबावाखाली पक्षांतर केल्याचा आरोप फेटाळून लावत, "असा कोणताही पुरावा असेल तर समोर आणावा," असं आव्हान त्यांनी विरोधकांना दिलं. मंत्रिपदाची कोणतीही अपेक्षा नसल्याचं सांगतानाच, राणा जगजितसिंह पाटील कुटुंबासोबतचा जुना राजकीय वाद अद्याप कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट संकेत दिले.
उद्धव ठाकरे यांच्याविषयी वैयक्तिक आदर कायम असल्याचं सांगत, नाराज शिवसैनिकांशी संवाद सुरू असल्याचंही ओमराजेंनी नमूद केलं. विकासासाठी मिळणारा निधी हा जनतेच्या कामांसाठीच वापरला जाईल आणि आपल्या निर्णयाचं खरं उत्तर २०२९ च्या निवडणुकीत मतदार देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




