'शब्दाला किंमत असते, तो पाळला तर विश्वास वाढतो'; अमोल मिटकरींनी फडणवीसांना दिलेल्या आश्वासनाची करून दिली आठवण

'शब्दाला किंमत असते, तो पाळला तर विश्वास वाढतो'; अमोल मिटकरींनी फडणवीसांना दिलेल्या आश्वासनाची करून दिली आठवण

मुंबई (प्रतिनिधी) : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याचे अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर हे खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडे दिले जाईल, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र, अधिवेशन संपूनही अर्थ खाते अद्याप मुख्यमंत्र्यांकडेच असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते पुन्हा पक्षाकडे देण्याची मागणी जोर धरत आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी 'एक्स'वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून पोस्ट करत त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. महायुती सरकारमधील विश्वास आणि परस्पर सन्मान कायम राखण्यासाठी अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

अमोल मिटकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, महायुती सरकार स्थापन होताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरणीय अजितदादांकडे अर्थ खात्याची जबाबदारी सोपवली होती आणि त्यांनी ती समर्थपणे पार पाडली. दादांनंतर अर्थसंकल्प मांडल्यानंतर हे खाते आदरणीय सुनेत्रा वहिनींकडे दिले जाईल, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे व्यक्त केली होती. त्यामुळे त्या खात्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचाच हक्क असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. राज्यभरातील लाखो कार्यकर्ते आजही त्या वचनपूर्तीची वाट पाहत आहेत.

ते पुढे म्हणाले, अजितदादांवर प्रेम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात याबाबत मोठी वेदना आहे. महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाचा स्वाभिमान जपला गेला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही महायुती मजबूत करण्यासाठी सातत्याने जबाबदारीने साथ दिली आहे. त्यामुळे दिलेला शब्द पाळणे ही केवळ राजकीय बाब नसून विश्वास, पारदर्शकता आणि परस्पर सन्मानाचा प्रश्न आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून त्यांनी पुढे म्हटले, राष्ट्रवादी काँग्रेसबाबत दिलेले आश्वासन पूर्ण करून अर्थ खाते पक्षाकडे सोपवावे. त्यामुळे महायुतीतील विश्वास अधिक दृढ होईल आणि कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रमही दूर होईल. पक्षाच्या सर्व आमदारांनीही कार्यकर्त्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत ठामपणे पोहोचवाव्यात. दिलेला शब्द पाळला जावा, एवढीच कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.

शेवटी त्यांनी म्हटले, शब्दाला किंमत असते. तो पाळला गेला तर विश्वास वाढतो आणि विश्वास टिकला तरच युती अधिक मजबूत होते. आता राज्याचे लक्ष मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लागले आहे.