दमदार पावसानंतर महाराष्ट्रात पुन्हा 'ब्रेक'; अल निनोचा प्रभाव वाढला
मुंबई (प्रतिनिधी) : जूनमध्ये हुलकावणी देणाऱ्या पावसाने जुलैच्या सुरुवातीला महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावत अनेक भागांना अक्षरशः झोडपून काढलं. त्यामुळे जूनमधील पावसाची तूट मोठ्या प्रमाणात भरून निघाली. मात्र आता मान्सूनचा वेग पुन्हा मंदावल्याने शेतकऱ्यांसह सर्वांचीच चिंता वाढू लागली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १० ते १५ जुलैदरम्यान महाराष्ट्रासह उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील आणि उत्तर भारतातील कमी दाबाची प्रणाली कमकुवत झाल्यामुळे ढगांची दाटी कमी झाली असून, ही स्थिती १९ जुलैपर्यंत कायम राहू शकते. मुंबई आणि कोकणात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असली, तरी राज्यातील अनेक भागांत उन्हाचा तडाखा वाढू शकतो.
हवामान तज्ज्ञांच्या मते, प्रशांत महासागरात सक्रिय होत असलेल्या 'अल निनो'चा मान्सूनवर परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे सलग पाऊस न पडता काही दिवस अतिवृष्टी आणि त्यानंतर अनेक दिवस उघडीप, असा पॅटर्न पाहायला मिळत आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी तोपर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मुंबईत मात्र जुलैच्या पहिल्या काही दिवसांतच विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. सांताक्रूज आणि कुलाबा या दोन्ही केंद्रांवर सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जूनमधील तूट भरून निघाली आहे.
दुसरीकडे, विदर्भात परिस्थिती चिंताजनक बनत आहे. १ जून ते १० जुलैदरम्यान विभागात सरासरीच्या तुलनेत १८ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे. गोंदिया जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला, तरी गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत पावसाची कमतरता कायम आहे.
नागपूर जिल्ह्यातही सरासरीपेक्षा सुमारे १० टक्के कमी पाऊस झाला आहे. पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास खरीप पिकांवर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष पुढील पावसाच्या आगमनाकडे लागले आहे.




