‘आम्ही रणगाडे-तोफगोळे घेऊन मुंबईला चाललोय का?’; पोलिसांनी परवानगी नाकारली, तरी लक्ष्मण हाके मुंबईत धडकण्यावर ठाम
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यभरात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. एका बाजूला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांनी मराठा समाजाला गनिमी काव्याने मुंबईत पोहोचण्याचं आवाहन केलं आहे. तर दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मुंबईच्या दिशेने ‘महा एल्गार मोर्चा’ काढण्याची घोषणा केली आहे. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असली, तरी लक्ष्मण हाके मुंबईच्या दिशेने जाण्यावर ठाम आहेत.

दौंड तालुक्यातील पाटस येथून हा मोर्चा थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. प्रा. लक्ष्मण हाके हे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून वाजतगाजत पाटस टोलनाक्याकडे रवाना झाले आहेत. राज्यभरातील ओबीसी बांधवांनी पाटस येथे एकत्र यावं, असं आवाहन त्यांनी केलं होतं. त्यानुसार पाटस टोलनाक्यावर ओबीसी कार्यकर्ते एकत्र जमले असून, तेथून मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत.
पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर संताप व्यक्त करताना लक्ष्मण हाके म्हणाले, “आम्ही रणगाडे, तोफगोळे घेऊन मुंबईला चाललो आहोत का? की एखादं विमान पाडण्यासाठी मुंबईला चाललो आहोत? आम्ही आमचं हक्काचं आरक्षण वाचवण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालो आहोत. पोलिसांनी त्यांचं काम केलं आहे, आम्ही आमच्या मागण्या घेऊन निघालो आहोत.
गरज पडल्यास पोलिसांनी आम्हाला अटक करावी. पण कोणत्याही ओबीसी नेत्याने पाठिंबा दिला नाही, तरीही हे आंदोलन थांबणार नाही,” असं त्यांनी म्हटलं.ओबीसींचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी काढण्यात येणाऱ्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही लक्ष्मण हाके आणि त्यांचे समर्थक मुंबईच्या दिशेने जाण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आता लक्ष्मण हाके यांच्या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष लागलं असून, पोलीस काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.




