ठाकरेंचे 14 आमदार नवरात्रीपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? तीन मंत्र्यांवर जबाबदारी; बड्या नेत्याचा मोठा दावा!
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणातली एक मोठी माहिती समोर आली आहे. आगामी नवरात्रीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 14 आमदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटातील एका बड्या नेत्याने केला आहे. या 14 आमदारांना शिवसेनेत आणण्याची जबाबदारी तीन मंत्र्यांवर सोपवण्यात आल्याची माहितीही शिंदेसेनेतील या नेत्याने दिली आहे.

सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे एकूण 20 आमदार आहेत. या 20 आमदारांपैकी 14 आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेल्या 20 आमदारांपैकी नेमके कोणते 14 आमदार शिंदे गटात जाणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्यांवर ‘ऑपरेशन टायगर’ची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याने दिली आहे. या 14 आमदारांपैकी 6 आमदारांना सरकारमध्ये चांगली खाती आणि मंत्रिपदं देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
यापैकी काही आमदारांची महामंडळ अध्यक्ष आणि राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्याबाबत पक्षांतर्गत चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहितीही समोर आली आहे. नवरात्रीपूर्वी या आमदारांचा पक्षप्रवेश झाल्यास ठाकरे गटाच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.यापूर्वी नुकतंच ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या 6 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. हा धक्का ताजा असतानाच आता 14 आमदारांच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू झाल्याने उद्धव ठाकरे यांच्या गटाची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये तब्बल 40 आमदारांना सोबत घेत अखंड शिवसेनेत ऐतिहासिक बंड केलं होतं. त्यानंतर आता चार वर्षांनी पुन्हा एकदा तसाच राजकीय धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटात गेल्यानंतर आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले ठाकरे गटाचे 20 आमदारही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




