पंतप्रधान मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी पुण्यात मोठी कारवाई; मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक, अमित ठाकरेंवरही गुन्हा
पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी करण्यासाठी गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा दौरा चांगलाच चर्चेत आला. याठिकाणी अमित ठाकरे मुख्याध्यापकांच्या कार्यालयात उभे असताना एका विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेजारी नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं.

तेव्हा अमित ठाकरे यांनी शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला नरेंद्र मोदी यांचा फोटो कशाला, असा सवाल मुख्याध्यापकांना केला. एवढंच नव्हे तर त्यानंतर मनसेचे प्रशांत कनोजिया आणि विक्रांत भिलारे यांनी नरेंद्र मोदी यांचा फोटो तिथून खाली उतरवला. या प्रकरणानंतर आता या दोन्ही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत कनोजिया आणि विक्रांत भिलारे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. चतुःश्रृंगी पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यासोबत मनसेच्या या कार्यकर्त्यांनी मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी कारवाई केली आहे.काल अमित ठाकरे यांच्यासह 20 ते 25 जणांवर पुण्यातील चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर रात्री उशिरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना पुणे पोलिसांनी अटक केली.
दरम्यान, पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी करण्यासाठी गेलेला अमित ठाकरे यांचा दौरा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अमित ठाकरे सोमवारी शिवाजीनगर येथील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयात गेले होते. याठिकाणी अमित ठाकरे यांनी कँटिनमधील जेवण आणि स्पोर्ट्स कोट्यातील खेळाडूंसाठी प्रशिक्षक नसल्याबद्दल महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना जाब विचारला. त्याचवेळी एका विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेजारी नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याचं अमित ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिलं.
यानंतर अमित ठाकरे यांनी शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला नरेंद्र मोदी यांचा फोटो कशाला, असा सवाल केला. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा फोटो तिथून खाली उतरवला. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणावरून आता पुण्यातील भाजप नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे.अमित ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदींचा फोटो काढण्याच्या कृतीचं समर्थन केलं. एका विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला मोदींचा फोटो लावल्याचं माझ्या लक्षात आणून दिलं. मोदींना एवढ्या थराला नेऊन ठेवू नका. नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी होऊ शकत नाही, असं अमित ठाकरे म्हणाले.
शासकीय महाविद्यालयात पंतप्रधानांचा फोटो लावण्याचा प्रोटोकॉल असेल, पण मग मोदींचा फोटो दुसरीकडे लावा. तो फोटो छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूला नको, असंही त्यांनी स्पष्ट केलं. भाजपचे नेते याचा निषेध करत असतील तर त्यांना विचारा की, तुम्हाला छत्रपती शिवराय आणि मोदींची तुलना मान्य आहे का? आम्ही महाराजांचा अपमान सहन करणार नाही. उद्या तुम्ही देवघरात मोदींचा फोटो लावाल, मोदी आणि शिवरायांचा फोटो बाजूला लावण्याच्या निर्णयाचं समर्थन भाजपचे नेते करणार आहेत का, असा सवालही अमित ठाकरे यांनी उपस्थित केला.




