हिंदी भाषेच्या आक्रमणाविरोधात मनसे-कन्नड रक्षक वेदिके एकत्र; कर्नाटकात ठरला ‘रोडमॅप’, दिल्लीत होणार महाअधिवेशन

हिंदी भाषेच्या आक्रमणाविरोधात मनसे-कन्नड रक्षक वेदिके एकत्र; कर्नाटकात ठरला ‘रोडमॅप’, दिल्लीत होणार महाअधिवेशन

मुंबई (प्रतिनिधी) : मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र धर्मासाठी लढा देणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तसेच कानडी भाषा आणि भाषिक हक्कांसाठी लढणारी ‘कन्नड रक्षक वेदिके’ या दोन्ही संघटना आता हिंदी भाषेच्या आक्रमणाविरोधात एकत्र आल्या आहेत. कर्नाटकात पार पडलेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत दोन्ही संघटनांच्या नेत्यांनी संयुक्त आंदोलन आणि लढा उभारण्याचा रोडमॅप निश्चित केला आहे.

या बैठकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे, मनसे सरचिटणीस योगेश परुळेकर आणि कन्नड रक्षक वेदिकेचे प्रदेशाध्यक्ष टी. ए. नारायण गौडा यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कर्नाटक, महाराष्ट्र तसेच देशातील इतर राज्यांमध्ये भाषा, सांस्कृतिक अस्मिता आणि बदलती लोकसंख्या यामुळे निर्माण होणाऱ्या विविध आव्हानांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत घेण्यात आलेले प्रमुख निर्णय : 

सर्व प्रादेशिक भाषांच्या रक्षणासाठी ‘इंडियन लँग्वेजेस फोरम’ या संयुक्त मंचाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतीय भाषांचे हक्क, अस्मिता आणि हितसंबंधांच्या संरक्षणासाठी विशेष 10 कलमी ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ तयार करून तो लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे.

आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात देशाची राजधानी दिल्ली येथे ‘इंडियन लँग्वेजेस फोरम’चे भव्य महाअधिवेशन आयोजित केले जाणार आहे.

या अधिवेशनात महाराष्ट्र आणि कर्नाटकासोबतच तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगणा, पुद्दुचेरी, गोवा, पश्चिम बंगाल आणि पंजाब यांसारख्या विविध राज्यांतील भाषिक प्रतिनिधींना एकत्र आणलं जाणार आहे.

कर्नाटक आणि महाराष्ट्रासह विशेषतः दक्षिणेकडील राज्यांच्या भाषा, संस्कृती आणि अधिकारांवर होणाऱ्या आक्रमणाविरोधात एकजूट दाखवत संयुक्त आंदोलन उभारण्यावर दोन्ही संघटनांचं एकमत झालं आहे.