अनिकेत तटकरे यांच्या राजकीय जन्मावर महेंद्र दळवींची टीका

अनिकेत तटकरे यांच्या राजकीय जन्मावर महेंद्र दळवींची टीका

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या अनेक दिवसांपासून रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये सातत्याने कुरबुरी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. अनिकेत तटकरे यांचा त्यांनी ‘सरोगसी बाळ’ असा उल्लेख केला आहे. विधानपरिषदेसाठी आम्ही फॉर्म काढला नसता, तर लढाई झाली असती आणि आम्ही जिंकलो असतो. अनिकेत तटकरे यांचा राजकीय जन्मच झाला नसता, अशा शब्दांत दळवींनी अनिकेत तटकरे यांच्यावर टीका केली.

शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. अनिकेत तटकरे यांचा त्यांनी ‘सरोगसी बाळ’ असा उल्लेख केला. आम्ही विधानपरिषदेसाठी फॉर्म काढला नसता, तर लढाई होऊन आम्ही जिंकलो असतो. अनिकेत तटकरे यांचा राजकीय जन्मच झाला नसता, अशा शब्दांत दळवींनी अनिकेत तटकरे यांच्यावर प्रहार केला आहे. आमदार महेंद्र दळवी यांच्या या टीकेनंतर रायगडमध्ये शिंदेसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा राजकीय वाद पेटण्याची चिन्हं दिसत आहेत. काल कर्जतमध्ये अनिकेत तटकरे यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आज दळवींनी त्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषदेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली होती. अखेरच्या क्षणी शिवसेना महाविकास आघाडीचे, म्हणजेच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला होता.

शिवसेना शिंदे गटाच्या कोकणातील आमदारांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार सुनील तटकरे यांच्यात चर्चा झाल्यानंतर शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. त्यामुळे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून गेले होते.