सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा ओबीसीचा दाखला असल्याचा दावा, लक्ष्मण हाकेंनी घेतली बड्या नेत्यांची नावं

सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा ओबीसीचा दाखला असल्याचा दावा, लक्ष्मण हाकेंनी घेतली बड्या नेत्यांची नावं

पुणे (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा मोठा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली.

यानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना मोठा दावा केला आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे की नाही, हे मला माहिती नाही. मात्र पवार कुटुंबीयांकडे सगळ्यांकडे ओबीसीचे प्रमाणपत्र असल्याचा दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे. महाराष्ट्रातील इतरही अनेक राजकीय घराण्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

लक्ष्मण हाके पुढे म्हणाले की, सुप्रिया सुळेंचं कुणबी प्रमाणपत्र आहे की नाही, मला माहिती नाही. मात्र मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार सुप्रिया सुळे रीतसर कुणबीचा दाखला काढू शकतात आणि भविष्यात त्या ओबीसीच्या जागेवर जिल्हा परिषद अध्यक्षही होऊ शकतात. सगेसोयऱ्यांचा त्यांचा आग्रह आहे ना? पण अजून एक सांगतो, सदानंद सुळे जरी ब्राह्मण असले, तरी ब्राह्मणाचंही कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं. मोडी लिपीचं ट्रान्सलेशन करायचं आणि तो दाखला घेऊन यायचा, संपला विषय.

त्यामुळे ब्राह्मणही, मराठा जर ओबीसीमध्ये येऊ शकत असेल तर ब्राह्मणही येऊ शकतो आणि जैनही येऊ शकतो. सुप्रिया सुळेंचा दाखला आहे की नाही, मला माहिती नाही. मात्र सुप्रिया सुळे इकडूनही कुणबी म्हणजेच ओबीसी होऊ शकतात आणि सदानंद सुळे यांच्याकडूनही होऊ शकतात. आता सुळेंचं मला माहिती नाही, पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला आहे, ही माझी पक्की माहिती आहे, असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला.

अजून कोणत्या नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे, असं विचारलं असता लक्ष्मण हाके म्हणाले की, खूप नेते आहेत. त्यामध्ये मी सोलापूर जिल्ह्यातून येतो. सोलापूर जिल्ह्यातून बबनराव शिंदे यांच्या दोन्ही मुलांकडे, विक्रम शिंदे आणि रणजित शिंदे यांच्याकडे, आमच्या पंढरपूरच्या भालकेंकडे आहे, आवताडेंकडे आहे. आमच्या भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्याकडे आहे.

त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्डिले असतील, गाडे असतील, अंबादास दानवे असतील, अशी अनेक उदाहरणं देता येतील. अगदी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचंही ओबीसीचं प्रमाणपत्र असल्याचा दावा हाके यांनी केला. पृथ्वीराज सुतार असतील किंवा अजून कोणी असतील, अशीही नावं त्यांनी घेतली.

मला सांगा, फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटला जातो. या सामाजिक न्यायाच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर महाराष्ट्रातील आमदार, खासदार आणि मंत्रीपदावर ज्यांची नेहमी मक्तेदारी आहे, शेकडो वर्षांचा महाराष्ट्राचा गावगाडा चालवण्याचा इतिहास आणि लिटरेचर आहे, या लोकांकडे जर मागासवर्गीयांचं प्रमाणपत्र असेल, तर यांच्या स्पर्धेमध्ये या गावगाड्यातला ओबीसी टिकेल का? असा सवालही लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.