देहूनगरी सज्ज! ७ जुलैला तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान ; छत्रपती संभाजी महाराजांच्या हस्ते होणार पादुका पूजन

देहूनगरी सज्ज! ७ जुलैला तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान ; छत्रपती संभाजी महाराजांच्या हस्ते होणार पादुका पूजन

पुणे :  'ज्ञानबा-तुकाराम' च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी देहूनगरी पूर्णपणे सज्ज झाली आहे. उद्या, म्हणजेच ७ जुलै रोजी दुपारी ठीक अडीच वाजता देहू येथून या सोहळ्याचे विधिवत प्रस्थान होईल. यंदाच्या पालखी सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे तब्बल २६० किलो चांदीचा वापर करून तयार करण्यात आलेला भव्य आणि नयनरम्य रथ!

राजस्थानातील सिहोर येथे १५० घनफूट सागवान लाकडावर आकर्षक कोरीव काम करून हा रथ साकारण्यात आला आहे. यंदाच्या प्रस्थान सोहळ्याला कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या पवित्र पादुकांचे पूजन केले जाईल. ७ जुलैला प्रस्थानानंतर पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात असेल, तर ८ जुलैला सकाळी पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होईल.

यंदाच्या वारीमध्ये सुमारे साडेचारशे दिंड्यांसह साडेतीन ते चार लाख वारकरी सहभागी होण्याची शक्यता आहे. या अथांग जनसागरासाठी देहू संस्थान आणि प्रशासनाने चोख आरोग्य व्यवस्था ठेवली आहे. विशेष म्हणजे यंदा देहू संस्थानच्या वतीने "हरित पालखी सोहळा" हा पर्यावरणपूरक उपक्रम राबवला जात असून, प्रत्येक वारकऱ्याला किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संदेश दिला जाणार आहे.

लाखोंच्या या गर्दीचे नियोजन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली १०० अधिकारी, ७५० पोलीस कर्मचारी आणि एसआरपीएफचे (SRPF) जवान देहूत तैनात आहेत. इंद्रायणी नदीकाठ, गाथा मंदिर परिसरात सीसीटीव्हीद्वारे २४ तास नजर ठेवली जात आहे.

भक्तीचा हा अथांग सागर आता पंढरीच्या दिशेने निघण्यासाठी सज्ज झाला असून, संपूर्ण महाराष्ट्राला आता आषाढी वारीचे वेध लागले आहेत.