अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा!" मुसळधार पाऊसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन

अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा!" मुसळधार पाऊसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन

मुंबई: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने रौद्ररूप धारण केले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मुंबईतील सखल भागात पाणी साचले असून सुरक्षेचा उपाय म्हणून 'मुंबई-पुणे एक्सप्रेसवे' आणि जुना हायवे दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत विशेष निवेदन दिले आणि नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे तसेच प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे:

·         ताशी ९० किमी वेगाने वारे वाहणार:
 मुंबईत दरवर्षी संपूर्ण पावसाळ्यात सरासरी ८०० झाडे पडतात, मात्र रविवारी एकाच दिवसात ३५० झाडे कोसळली आहेत. आज दुपारनंतर ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने कंपन्यांना 'वर्क फ्रॉम होम' देण्याची विनंती करण्यात आली आहे.

·         मुंबई-पुणे मार्ग बंद, रेस्क्यू ऑपरेशन सुरू:
 एक्सप्रेसवेवरील कनेक्टिंग लिंकपाशी दरड कोसळल्याने हा मार्ग तातडीने बंद करण्यात आला आहे. मार्गावर अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुण्यात आणि मुंबईत दोन्ही बाजूंनी नागरिकांना प्रवास न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

·         यंत्रणा अलर्ट मोडवर:
मानखुर्द येथे झालेली इमारत दुर्घटना दुर्दैवी आहे. ही इमारत बेकायदेशीर होती. सध्या महापालिका
, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरून काम करत आहेत. धोकादायक ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

तरुणांना धबधब्यांवर न जाण्याचे आवाहन:
मुख्यमंत्र्यांनी विशेषतः तरुण वर्गाला आवाहन केले आहे की, अशा धोकादायक परिस्थितीत धबधबे किंवा निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनासाठी जाणे पूर्णपणे टाळावे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दुपारी १२ वाजता विशेष बैठक बोलावण्यात आली असून, या आपत्तीवर मंगळवारी विधिमंडळात सविस्तर निवेदन दिले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.