नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकांसाठी जोमाने कार्यरत रहावे- राज्य गृहमंत्री पंकज भोयर
कोल्हापूर (प्रतिनिधी) - आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टी ची तयारी सुरू झाली असून याचा अनुषंगाने आज राज्य गृहमंत्री पंकज भोयर यांनी कोल्हापूर जिल्हा दौरा केला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकांसाठी जोमाने कार्यरत रहावे असे प्रतिपादन राज्य गृहमंत्री पंकज भोयर यांनी यावेळी केले.

भाजपा जिल्हा कार्यालयात आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरच्या नऊ मंडलाच्या कार्यकारण्या घोषित केल्या. भाजपा नऊ मंडल अध्यक्ष पुढील प्रमाणे कसबा बावडा धीरज पाटील, शाहूपुरी सचिन कुलकर्णी, लक्ष्मीपुरी विशाल शिराळकर, राजारामपुरी उत्तर रविकिरण गवळी, राजारामपुरी दक्षिण राज गणेश पोळ, मंगळवार पेठ दक्षिण प्रीतम यादव, शिवाजी पेठ उत्तर कोमल देसाई, शिवाजी पेठ दक्षिण विनय खोपडे, उत्तरेश्वर सुनील पाटील.
गृहराज्यमंत्री पंकज भोयर पुढे म्हणाले, राज्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाचा आलेख सर्व स्पर्शी असून विविध क्षेत्रांमध्ये आज महाराष्ट्र राज्याने प्रगती केली आहे केंद्र व राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्य नागरिकांच्या पर्यंत पोहोचवणे ही आपली प्राथमिक जबाबदारी असून महापालिका जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवणे यासाठी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांसाठी आत्तापासूनच पक्ष विस्तार आणि प्रचारासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.
आजच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी एक राखी देवा भाऊंसाठी या उपक्रमांतर्गत शहरातील महिलांच्या वतीने देवाभाऊंसाठी राख्यांचा बॉक्स मंत्री महोदय यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी आगामी निवडणुका संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, पश्चिम जिल्हाध्यक्ष नाथजी पाटील, राहुल चिकोड़े, डॉ. राजवर्धन, गायत्री राऊत, रूपाराणी निकम, गिरीष साळोखे, प्रमुख पदाधिकारी व नवनियुक्त मंडल पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




