सुप्रिया सुळे यांच्या OBC प्रमाणपत्राच्या दाव्यावरून वाद

सुप्रिया सुळे यांच्या OBC प्रमाणपत्राच्या दाव्यावरून वाद

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा मोठा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. वडेट्टीवारांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेस नेत्यांच्या अशा वागण्यामुळेच 2014 मध्ये सरकार गेलं, असा पलटवारही त्यांनी केला आहे. तर अंबादास दानवे यांनी नियमांमध्ये बसत असेल तर त्यात वावगं काय आहे, असा सवाल केला.

विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसकडून रोज असे आरोप केले जात असल्याचं दुःख होतंय, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. मी कधीच काँग्रेसला टार्गेट केलं नाही, मग काँग्रेस मला रोज का टार्गेट करते, हे माहिती नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. उलट आपण नेहमी काँग्रेसची पाठराखण केली असल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे की, विजय वडेट्टीवार यांनी माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा आरोप केला आहे. माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याची माहिती त्यांना नेमकी कोणी आणि कोणत्या आधारावर दिली, हे त्यांनी जाहीर करावं. तसेच माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा त्यांचा दावा असेल, तर त्यांनी त्यासंदर्भातील पुरावा जाहीरपणे सादर करून तो सिद्ध करावा. अन्यथा कोणत्याही पुराव्याशिवाय केलेल्या या आरोपाबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विखे पाटील यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा आरोप होत आहे, असा प्रश्न काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना विचारण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले की, फक्त विखे पाटीलच नाही, तर अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसीचे प्रमाणपत्र आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही ओबीसी प्रमाणपत्र काढून ठेवलं आहे, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. सर्वच मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचं सांगत, शरद पवारांकडे देखील ओबीसी प्रमाणपत्र आहे का, हे मला माहित नाही, असं विधान विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना केलं.

विजय वडेट्टीवारांच्या या दाव्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे सर्व ऐकून मला धक्का बसला. माझ्याकडे माझं जन्म प्रमाणपत्र आहे, डिग्रीचं प्रमाणपत्र आहे, त्यानंतर माझ्या लग्नाचं प्रमाणपत्र आणि बारामतीच्या खासदार म्हणून माझ्याकडे प्रमाणपत्र आहे. त्यामुळे रोज उठून काँग्रेस अशा प्रकारचे आरोप का करतेय, याबाबत मला आश्चर्य वाटतंय, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

तसेच माझ्याकडे कोणतंही ओबीसी प्रमाणपत्र नाही, हे मी नक्की सांगते, असंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस पक्षाकडून मला दररोज टार्गेट का केलं जातंय, याबाबत मी महाराष्ट्र काँग्रेसलाच विचारावं लागेल, हे दुर्दैवी आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.