मराठी प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमात भोजपुरी गाण्यांवर डान्स; प्रकाश सुर्वेंचा कार्यक्रम चर्चेत
मुंबई (प्रतिनिधी) : पश्चिम उपनगरातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी भाषा प्रशिक्षण शिबिरातील सहभागासाठी काल, बुधवारी (26 ऑगस्ट) प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं.

बोरिवलीतील कोरा केंद्र ग्राउंडवर झालेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते सुमारे 20 हजार रिक्षाचालकांना मराठी भाषेची प्रमाणपत्रं देण्यात आली. मात्र, या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच भोजपुरी गाणी वाजवण्यात आली आणि भोजपुरी गाण्यांवर नृत्यही सादर करण्यात आलं.
एका बाजूला रिक्षाचालकांना मराठी भाषेची प्रमाणपत्रं देऊन मराठी भाषेचा अभिमान जपण्याचा संदेश दिला जात असताना, दुसरीकडे याच कार्यक्रमाच्या मंचावर भोजपुरी गाण्यांवर तरुणींचं नृत्य सादर करण्यात आलं. त्यामुळे मराठी भाषेच्या प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमात भोजपुरी गाण्यांवर झालेला हा डान्स चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, या प्रकारावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत कार्यक्रमाच्या आयोजकांवर निशाणा साधला. मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमा असताना महिलांचं नृत्य सादर करण्यात आल्याचा आरोप चित्रे यांनी केला.
तसंच, महाराष्ट्राची संस्कृती, स्वाभिमान आणि अस्मितेबाबतही अखिल चित्रे यांनी सवाल उपस्थित केले आहेत. त्यामुळे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम आता राजकीय टीकेचा आणि चर्चेचा विषय बनला आहे.




