माजलगावच्या नगरसेविका रेखा सरोदेंचा 'तो' खेळ फसला! पद रद्द होणार?
बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे! माजलगाव नगरपरिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका रेखा सरोदे यांचा एक मोठा डाव आता पुरता फसला आहे. जिल्हा जात पडताळणी समितीने त्यांचे 'मराठा कुणबी' जात प्रमाणपत्र थेट अवैध ठरवले असून, ते तात्काळ जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता रेखा सरोदे यांचं नगरसेवक पद रद्द होणार का? अशी चर्चा रंगात आली आहे.

मित्रांनो, माजलगाव नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १ मधून, मागास महिला प्रवर्गाच्या आरक्षित जागेवरून रेखा सरोदे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांनी निवडणुकीसाठी सादर केलेले कुणबी जात प्रमाणपत्र खोटे आणि चुकीच्या पुराव्यांच्या आधारे मिळवले असल्याचा आक्षेप सुमन मुंडे यांनी घेतला होता. मुंडे यांनी यासंदर्भात थेट जिल्हा जात पडताळणी समितीकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. आणि आता या प्रकरणाचा निकाल समोर आलाय.
जात पडताळणी समितीच्या चौकशीत अत्यंत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. रेखा सरोदे यांच्या मूळ शालेय उताऱ्याची तपासणी केली असता, त्यावर केवळ 'हिंदू' किंवा 'हिंदू मराठा' अशी नोंद होती. संपूर्ण रेकॉर्डमध्ये कुठेही 'कुणबी' असा उल्लेख नव्हता.मग कुणबी जात सिद्ध करण्यासाठी सरोदे यांनी एक अनोखी शक्कल लढवली. त्यांनी कुप्पा गावचे रहिवासी असलेल्या 'यशवंत संभाजी' नावाच्या व्यक्तीला आपले 'खापर पंजोबा' दाखवले आणि त्यांच्या जुन्या कुणबी नोंदीच्या आधारे स्वतःचा कुणबी दाखला मिळवला.
पण समितीने जेव्हा सखोल तपास केला, तेव्हा सरोदे यांचा हा खेळ उघडा पडला! हे यशवंत संभाजी प्रत्यक्षात तिथल्या स्थानिक 'सावंत' कुटुंबाचे पूर्वज निघाले. धक्कादायक म्हणजे, याच यशवंत संभाजी यांच्या पुराव्यांच्या आधारावर पृथ्वीराज दादासाहेब सावंत यांना आधीच जात वैधता प्रमाणपत्र मिळालेलं आहे. म्हणजेच सरोदे यांनी दुसऱ्याच कुटुंबाच्या पूर्वजांचा वापर करून हा दाखला मिळवला होता, हे सिद्ध झालं.
चुकीच्या व्यक्तीला पूर्वज दाखवून मिळवलेला हा कुणबी दाखला आता जात पडताळणी समितीने जप्त केला आहे. आरक्षित जागेवर निवडणूक लढवण्यासाठी लागणारे मूळ जात प्रमाणपत्रच अवैध ठरल्यामुळे, आता कायद्यानुसार रेखा सरोदे यांचे नगरसेवक पद रद्द होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या मोठ्या धक्क्यानंतर आता बीडच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक राजकारणात काय हालचाली होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




