सोनम वांगचुकांना आंदोलनस्थळावरून रुग्णालयात हलवलं; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर सवाल

सोनम वांगचुकांना आंदोलनस्थळावरून रुग्णालयात हलवलं; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर सवाल

मुंबई (प्रतिनिधी) : पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर येथील आंदोलनस्थळावरून वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात हलवल्यानंतर या कारवाईवर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका करत ही कारवाई योग्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच, वांगचुक यांच्या पत्नीला त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

जयंत पाटील म्हणाले की, सोनम वांगचुक गेल्या वीस दिवसांपासून शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करत होते. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवणे आवश्यक असू शकते, मात्र आंदोलन करणाऱ्या इतर समर्थकांना हटवण्यामागचे कारण स्पष्ट होत नसल्याचे त्यांनी सांगितले.याआधीही वांगचुक यांना ताब्यात घेऊन राजस्थानमध्ये नेण्यात आले होते. त्या वेळी त्यांच्या पत्नीला त्यांच्याशी भेटण्याची किंवा संवाद साधण्याची परवानगी मिळाली नव्हती, असा उल्लेख करत पाटील यांनी त्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित केले.

सोनम वांगचुक 28 जूनपासून 'नीट' पेपरफुटी प्रकरणाच्या विरोधात उपोषण करत होते. त्यांच्यासोबत अभिजीत दिपके हे देखील आंदोलनात सहभागी होते. या दीर्घ उपोषणामुळे वांगचुक यांचे वजन मोठ्या प्रमाणात घटल्याचे आणि त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी चिंता व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.याच पार्श्वभूमीवर दिल्ली हायकोर्टाच्या आदेशाचा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचा आधार घेत दिल्ली पोलिसांनी त्यांना पहाटे रुग्णालयात दाखल केले. या कारवाईदरम्यान आंदोलनस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, तर अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, 20 जुलै रोजी प्रस्तावित 'संसद मार्च'मुळे या आंदोलनाकडे देशाचे लक्ष लागले आहे.