पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे दर्शन 23-24 जूनला बंद; मूर्ती संवर्धनासाठी विशेष लेपन प्रक्रिया

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे दर्शन 23-24 जूनला बंद; मूर्ती संवर्धनासाठी विशेष लेपन प्रक्रिया

पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठ्ठल मूर्तीच्या संवर्धनासाठी विशेष लेपन प्रक्रिया हाती घेण्यात येणार असल्याने 23 आणि 24 जून रोजी मंदिर सर्व प्रकारच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. मंदिर प्रशासनाने भाविक, वारकरी आणि पर्यटकांना या दोन दिवसांत पंढरपूरला येण्याचे नियोजन टाळण्याचे आवाहन केले आहे.

विठ्ठल मूर्तीवर कालांतराने झालेली नैसर्गिक झीज लक्षात घेऊन भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI), राज्य पुरातत्त्व विभाग आणि मूर्ती संवर्धन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 22 ते 24 जूनदरम्यान संवर्धनाचे काम करण्यात येणार आहे. यासाठी रासायनिक पद्धतीने संरक्षक लेपन केले जाणार असून मूर्तीवरील झिजलेल्या भागांची दुरुस्तीही केली जाणार आहे.

मूर्तीच्या पायाजवळ झीज झाल्याचे तसेच काही ठिकाणी सूक्ष्म छिद्रे निर्माण झाल्याचे निरीक्षण समोर आल्यानंतर संवर्धनाची आवश्यकता अधोरेखित झाली होती. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध पर्यायांवर चर्चा करून अखेरीस पुरातत्त्व विभागाच्या शिफारशीनुसार रासायनिक लेपनाचा निर्णय घेण्यात आला.

संवर्धनाच्या तांत्रिक प्रक्रियेदरम्यान मूर्तीची सुरक्षितता, पावित्र्य आणि कामाची गुणवत्ता अबाधित राहावी यासाठी 23 आणि 24 जून रोजी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यापूर्वी 1988, 2005, 2012 आणि 2020 मध्येही अशाच प्रकारे मूर्तीचे संवर्धन करण्यात आले होते.