ओमराजे निंबाळकरांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंची मोठी चाल! धाराशिवच्या नेत्यांना मातोश्रीवर तातडीचे बोलावणे
मुंबई ( प्रतिनिधी) : शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे.ठाकरे गटाने सर्व खासदारांना बैठकीसाठी व्हिप जारी केला होता. मात्र, ओमराजे निंबाळकर या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य ओळखत उद्धव ठाकरे यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. धाराशिवमधील संघटना मजबूत ठेवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचा विश्वास कायम राखण्यासाठी त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, आमदार आणि जिल्हाप्रमुखांना मातोश्रीवर बैठकीसाठी बोलावले आहे.पक्षाच्या वर्धापन दिनानंतर होणाऱ्या या बैठकीत स्थानिक राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असून आगामी रणनीतीवर चर्चा होणार आहे. तसेच वर्धापन दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्याच्या सूचनाही दिल्या जाणार आहेत.
दुसरीकडे, शिंदे गटाकडून मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये पक्षाचा ६० वा वर्धापन दिन भव्य स्वरूपात साजरा करण्याची तयारी सुरू आहे. राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.तर ठाकरे गटाचाही वर्धापन दिन सायन येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडणार असून, दोन्ही गटांच्या शक्तिप्रदर्शनाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.




