MPSC अध्यक्ष मोठ्या नेत्याचे मित्र; राजीनामा द्या, अन्यथा आंदोलन करू; पेपरफुटीवर रोहित पवार आक्रमक
पुणे (प्रतिनिधी) : अन्न व औषध प्रशासनाच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे आरोप आणि पुरावे समोर आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गुन्हे अन्वेषण शाखेच्या अहवालानुसार परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं निष्पन्न झालं असून, एका उमेदवाराला या परीक्षेचा प्रश्नसंच मिळाल्याचंही समोर आलं आहे. MPSCच्या या निर्णयामुळे पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणात सर्वप्रथम आमदार रोहित पवार यांनी पेपरफुटीचा आरोप केला होता. याच पार्श्वभूमीवर त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला.

रोहित पवार म्हणाले की, अनेक विद्यार्थी शेतकरी कुटुंबातून आले आहेत. आई-वडील कर्ज काढून मुलांच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करतात. अशा परिस्थितीत विद्यार्थी मेहनत करून परीक्षा देतात आणि पेपर फुटला तर त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरलं जातं. मी जेव्हा आरोप करतो, तेव्हा पुरावे असतानाच बोलतो. आवाज उठवल्यानंतर मला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली जाते, असा आरोपही त्यांनी केला.
जलसंपदा, राज्य उत्पादन शुल्क, तलाठी भरती, FDA आणि SRPF अशा अनेक परीक्षांच्या पेपरफुटीचे आरोप झाले आहेत. MMRDA पेपरफुटीच्या प्रकरणाबाबत आपण शिंदे यांची भेट घेतल्याचंही रोहित पवारांनी सांगितलं. FDA परीक्षेचा पेपर फुटला नसल्याचं सुरुवातीला सांगितलं जात होतं. मात्र, आता MPSCने पेपरफुटी मान्य करून परीक्षा रद्द केली आहे. त्यामुळे या प्रकरणात जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
MPSCचे अध्यक्ष हे एका मोठ्या नेत्याचे मित्र असल्याचा आरोप करत रोहित पवार म्हणाले की, त्यांच्या RTOच्या कार्यकाळातील कारभाराबाबतही महाराष्ट्रात चर्चा आहे. MPSC अध्यक्ष आणि सचिवांनी राजीनामा द्यावा. स्वच्छ प्रतिमा असलेल्या अधिकाऱ्याला आयोगाची जबाबदारी द्यावी."राजीनामा दिला नाही तर 1 तारखेला MPSCच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करू. तुम्हाला वेळ देत आहोत, वेळेत राजीनामा द्या; अन्यथा जाब विचारायला आम्ही तिथे येऊ," असा इशाराही रोहित पवार यांनी दिला.
पेपर ऑफलाइन पद्धतीनेच घ्यावेत, अशी आमची भूमिका आहे. ऑनलाइन परीक्षांचे पेपरही फुटतात. या प्रकरणात कोणाकोणावर FIR दाखल झाले आहेत, हे समोर आलं पाहिजे. या पेपरफुटीत तीन अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती मिळत असल्याचा दावाही रोहित पवार यांनी केला. काही लोक फक्त बोलतात, मात्र आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. यावेळी विद्यार्थ्यांनी "I Love You रोहित पवार" अशा घोषणा दिल्या. रोहित पवार यांनी एका विद्यार्थ्याची भेट घेऊन त्याला मिठीही मारली.
दरम्यान, MPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली. तर पुण्यात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या 'छात्रों की गुंज' कार्यक्रमात एका विद्यार्थिनीने पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केला होता.




