नागपुरात काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर गोळीबार; CCTV मध्ये थरार कैद
मुंबई (प्रतिनिधी) : "माझे कुटुंबीय प्रचंड दहशतीत आहेत. पोलिसांनी माझ्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना 24 तासांच्या आत अटक करावी आणि मला सुरक्षा द्यावी," अशी मागणी नागपूर प्रभाग क्रमांक 26 चे काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांनी केली आहे.मंगळवारी, 25 ऑगस्ट रोजी रात्री नागपुरात शुभम मोटघरे यांच्या घराच्या दिशेने दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली. रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून गोळीची एक पुंगळीही जप्त केली आहे.

प्रभागातील एका कार्यक्रमातून घरी परतल्यानंतर शुभम मोटघरे पहिल्या मजल्यावरील बाल्कनीत शूज काढत होते. त्यावेळी घरासमोरून दुचाकीवरून जाणाऱ्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी घराच्या दिशेने बंदूक रोखून गोळीबार केल्याचा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, घरासमोरील CCTV कॅमेऱ्यात दुचाकीवरून जाणारे दोन संशयित हल्लेखोर कैद झाले आहेत. गोळीबार झाला त्यावेळी शुभम मोटघरे आणि त्यांचा संपूर्ण परिवार घरीच होता. या घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये भीतीचं वातावरण असून, हल्लेखोरांना तातडीने अटक करून सुरक्षा देण्याची मागणी मोटघरे यांनी केली आहे.
दरम्यान, राजुरा शहरातील गोळीबार प्रकरणात मृत पापा जाधव यांच्या समर्थकांनी मृतदेहासह पोलीस स्टेशन चौकात रास्ता रोको केला. यावेळी जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. या दगडफेकीत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहनाची काच फुटल्याची माहिती आहे.राजुरा शहरातील गोळीबारात मृत्यू झालेल्या पापा जाधव यांची आज अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी त्यांच्या समर्थकांनी चौकात रास्ता रोको करत आरोपींना आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. पोलिसांशी झालेल्या संघर्षानंतर जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. या घटनेत महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचं सांगण्यात आलं.
परिस्थिती चिघळत असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलावली आणि जमावावर सौम्य लाठीमार केला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि अंत्यसंस्कार पार पडले.दरम्यान, पोलिसांनी या हत्येप्रकरणी दोन मुख्य हल्लेखोरांसह आणखी तिघांना ताब्यात घेतलं आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहनंही जप्त करण्यात आली आहेत. युवकांच्या दोन गटांमधील जुन्या वैमनस्यातून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.




