सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावर पक्षातूनच प्रश्नचिन्ह? नोटीसवर प्रफुल पटेलांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत राजकारणाची चर्चा रंगली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीवर आता पक्षातूनच आक्षेप घेण्यात आला आहे.पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवत सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाची निवड पक्षाच्या घटनेनुसार झालेली नसल्याचा दावा केला आहे. तसेच राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

या घडामोडींनंतर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, "या नोटीसशी माझा कोणताही संबंध नाही. नोटीसला फार महत्त्व देण्याचं कारण नाही. सुनेत्रा पवार यांची निवड पक्षाच्या घटनेनुसारच झाली आहे."
प्रफुल पटेल यांनी पुढे सांगितलं की, अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली असून ती भरून काढण्यासाठी काही संघटनात्मक बदलांची गरज असल्याचं त्यांनी यापूर्वी अनौपचारिक चर्चांमध्ये मत व्यक्त केलं होतं. मात्र त्या मताचा आणि सच्चिदानंद सिंह यांच्या नोटीशीचा कोणताही संबंध नसल्याचं त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं.
दरम्यान, या नोटीसमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत. ही नोटीस सच्चिदानंद सिंह यांनी स्वतःच्या निर्णयाने पाठवली की त्यामागे इतर कोणाचा सहभाग आहे, याचाही पक्षाकडून आढावा घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.आता पक्षाची शिस्तपालन समिती आणि वरिष्ठ नेतृत्व या प्रकरणात काय भूमिका घेणार, तसेच नोटीसला अधिकृत उत्तर काय दिलं जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.




