मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण; ज्यांनी मागितलं त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात 58 लाख कुणबी नोंदी सापडूनही अनेकांना जात प्रमाणपत्र मिळत नसल्याचा आरोप करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत, ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले असून, प्रलंबित प्रकरणांची संख्या अत्यल्प असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांनी ज्यांनी जात प्रमाणपत्र मागितलं, त्यांना ते देण्यात आलं आहे. या संदर्भातील प्रलंबित प्रकरणं आता खूप कमी आहेत. तरीही कुणाला काही अडचण वाटत असेल, तर त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्यासाठी सरकार तयार आहे.
फडणवीस यांनी पुढे सांगितले की, महायुती सरकारने मराठा समाजासाठी यापूर्वीच्या कोणत्याही सरकारपेक्षा अधिक निर्णय घेतले आहेत. अजून काही प्रश्न शिल्लक असतील, तर संवादातून त्यावर तोडगा काढण्याची सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूरमधील पावसाच्या परिस्थितीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, संध्याकाळनंतर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे पाणी साचण्याच्या घटना घडल्या असल्या, तरी अतिवृष्टीसारख्या परिस्थितीत मर्यादा येतात, असे त्यांनी सांगितले.
पीक विमा योजनेबाबत येणाऱ्या तक्रारींवर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अर्ज झाले, मात्र त्यामध्ये बोगस प्रकरणेही आढळली. त्यावर कारवाई करण्यात आल्याने लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या टीकेलाही मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले. विरोधी पक्षाने सरकारवर टीका करावी, पण युवकांच्या हितासाठी त्यांनी नेमकं काय केलं, हा प्रश्न आहे. पेपरफुटीविरोधी विधेयक मंजूर झाल्यास त्याचा फायदा विद्यार्थ्यांनाच होईल, असे ते म्हणाले.
दरम्यान,नीट पेपरफुटी आंदोलनादरम्यान मुंबईत दाखल झालेले जमावबंदीचे गुन्हे मागे घेतले जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र पोलिसांनी या आंदोलनादरम्यान संयमाची भूमिका घेतल्याचे सांगत, केवळ प्रतिबंधात्मक स्वरूपाचे गुन्हेच दाखल झाले असून ते मागे घेण्याची प्रक्रिया केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांच्या नावाने लावण्यात आलेल्या बॅनर्सबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, काही जण स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी नक्षलवाद्यांचे नाव वापरत आहेत. अशा प्रकारांमागील व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.




