निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिरातील चोरीवर FIR नाही? नृपेंद्र मिश्रा यांच्या 14 मुलाखतींवर चंपत राय यांचे सवाल
मुंबई (प्रतिनिधी) : राम मंदिराचे माजी सरचिटणीस चंपत राय यांच्या डायरीतील काही धक्कादायक तपशील समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. सूत्रांनुसार, देणगी चोरीचे प्रकरण समोर आल्यानंतर तातडीने एफआयआर दाखल न करण्यामागे आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार असल्याचं त्यांनी डायरीत नमूद केलं आहे. तपास लांबल्यास त्याचा निवडणुकीवर परिणाम होण्याची भीती होती, असंही त्यात म्हटलं आहे.

चंपत राय यांनी मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी देणगी चोरीला 'दरोडा' म्हटल्याने समाजात चुकीचा संदेश गेल्याचं चंपत राय यांनी नमूद केलं आहे. एका संताने आपल्याशी बोलताना आपल्याला खलनायक म्हटल्याचाही उल्लेख त्यांनी केला आहे.
नृपेंद्र मिश्रा यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तीने चार दिवसांत तब्बल 14 माध्यमांना मुलाखती का दिल्या आणि कोणाच्या सांगण्यावरून दिल्या, असा सवाल चंपत राय यांनी डायरीत केला आहे. गेल्या सहा वर्षांत मंदिर बांधकाम समितीच्या बैठकीत त्यांनी व्यवस्थापन किंवा हिशोबाबाबत चर्चा केली नाही, मग आता या विषयांवर बोलण्याचा त्यांना अधिकार काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
यासोबतच ही माहिती समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यापर्यंत कशी पोहोचली आणि ती माहिती देणारा नेमका कोण आहे, असा सवालही चंपत राय यांनी केला आहे. "खरा माहिती देणारा कोण आहे?" हा आपल्यासमोरचा सर्वात मोठा प्रश्न असल्याचं त्यांनी डायरीत लिहिल्याचं सांगितलं जात आहे.
डायरीतील नोंदीनुसार, 7 जून रोजी म्हणजेच देणगी चोरीचं प्रकरण समोर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा आणि NBCC चे माजी अध्यक्ष अनूप कुमार अयोध्येत आले होते. त्यांच्यात सुमारे दोन तास चर्चा झाली. यावेळी चंपत राय, माजी विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांनी घटनेची संपूर्ण माहिती दिली.
नृपेंद्र मिश्रा यांनी पोलिसांत एफआयआर का दाखल केला नाही, असा प्रश्न विचारला. त्यावर पोलिसांकडे प्रकरण सोपवल्यास तपास आणि कारवाईचे सर्व अधिकार पोलिसांकडे जातील आणि त्याचा निकाल काय लागेल, हे सांगता येणार नाही, असं चंपत राय यांनी सांगितल्याचं डायरीत नमूद आहे.बैठकीनंतर चंपत राय यांनी अनेक संतांशी फोनवर चर्चा केली आणि त्यांना चोरीच्या प्रकरणाची माहिती दिली. त्यांना अयोध्येला येण्याचं निमंत्रणही देण्यात आलं. मंदिर परिसरातील शेषावतार मंदिरात संतांची बैठक घेण्यात आली. या प्रकरणातील अहवाल निराधार असल्याचं सांगत त्याकडे दुर्लक्ष करण्याचा आग्रह संतांनी केला, असंही डायरीत नमूद आहे.
प्रकरण समोर आल्यानंतर सलग तीन दिवस दररोज सुमारे 11 तास बसून चोरीला गेलेल्या देणगीपैकी मोठा हिस्सा परत मिळवण्यात आल्याचाही उल्लेख चंपत राय यांनी केला आहे.नृपेंद्र मिश्रा यांनी माध्यमांना दिलेल्या विधानांचाही चंपत राय यांनी डायरीत उल्लेख केला आहे. सुरुवातीला आपली जबाबदारी केवळ मंदिर बांधकामापुरती मर्यादित असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, नंतर त्यांच्या वक्तव्यांमध्ये बदल झाला. 23 जूननंतर नृपेंद्र मिश्रा यांची वक्तव्ये अचानक थांबली. यामागचं कारण काय, याची चौकशी व्हायला हवी, असं चंपत राय यांनी लिहिलं आहे.
14 जुलै रोजी अनूप मित्तल यांच्यासोबत दोन तास झालेल्या भेटीचाही उल्लेख डायरीत आहे. नृपेंद्र मिश्रा खलनायकाची भूमिका साकारत आहेत का, असा सवाल काही संत आपल्याला विचारत होते. मात्र, त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं, म्हणूनच आपण या प्रकरणाची माहिती देत असल्याचं चंपत राय यांनी नमूद केल्याचं सांगितलं जात आहे.




