प्रत्येक मतदारसंघात स्पर्धा परीक्षा केंद्र, आमदार-खासदारांकडे फेलोशिप; श्रीकांत शिंदेंची Gen-Z ला ग्वाही
मुंबई (प्रतिनिधी) : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात अभ्यास केंद्र सुरू करण्यात येईल. तसेच आमदार आणि खासदारांकडे फेलोशिप प्रोग्रॅम सुरू करण्याबाबत शिवसेनेकडून लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.अंधेरी येथे आमदार मुरजी पटेल यांनी आयोजित केलेल्या युवा संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार रवींद्र वायकर, महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, आनंद परांजपे आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार डॉ. शिंदे यांनी कार्यक्रमात उपस्थित Gen-Z तरुणांशी थेट संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेतले. ते म्हणाले की, NEET पेपरफुटीनंतर संसदेत कठोर कायदा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये दोषींना 10 वर्षांपर्यंतचा कारावास आणि 10 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. भविष्यात परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर कायदा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सक्षम यंत्रणा उभारली जाईल.स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अंबरनाथमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात आलं असून, या केंद्रातून अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
याच धर्तीवर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्पर्धा परीक्षा केंद्र आणि 24 तास लायब्ररी सुरू करण्याचा विचार असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. तसेच खासदार आणि आमदारांकडे फेलोशिप सुरू करण्याबाबत पक्ष विचार करत आहे. यामधून तरुणांना राजकारण आणि धोरणनिर्मितीचा प्रत्यक्ष अनुभव दिला जाईल, असंही ते म्हणाले.
Gen-Z च्या माध्यमातून जगभरात उपस्थित केले जाणारे प्रश्न सरकार ऐकत असून त्यावर प्रतिसाद देत आहे. विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र कसा असावा, हे Gen-Z कडून समजून घेण्याची गरज आहे, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.महाराष्ट्र हे देशाचं स्टार्टअप हब बनत आहे. राज्याने AI साठी नवीन धोरण तयार केलं असून, स्टार्टअप्ससाठी सर्वसमावेशक इकोसिस्टम तयार करण्याचं काम राज्य सरकार करत आहे, असं त्यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजनेप्रमाणे Gen-Z साठीही काही योजना सुरू करता येईल का, याचा नक्की विचार करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
रेल्वेमधून विद्यार्थ्यांना प्रवासासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करू, असंही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.
काही लोक Gen-Z ला केवळ मतदार म्हणून टार्गेट करत आहेत आणि त्यांच्या नावावर अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली. मात्र, Gen-Z ही हुशार पिढी आहे. कोण त्यांचा वापर करत आहे आणि कोण त्यांना मतदानासाठी वापरणार आहे, हे त्यांना माहिती आहे, असंही ते म्हणाले. देशभर फिरून राजकीय संदेश देणाऱ्यांवरही त्यांनी राहुल गांधींचं नाव न घेता टीका केली.
दरम्यान, 2014 पूर्वी भारतातील रोजगार, बेरोजगारी आणि पायाभूत सुविधांची स्थिती काय होती आणि त्यानंतर काय बदल झाला, याचा अभ्यास करण्याची गरज आहे, असं श्रीकांत शिंदे यांनी Gen-Z ला सांगितलं.भारताचा नेट एम्प्लॉयमेंट आउटलूक इंडेक्स 68 टक्के असून, अमेरिकेचा 38 टक्के आणि चीनचा 29 टक्के आहे. रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकार आवश्यक त्या उपाययोजना करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.




