खड्ड्यातील अपघातात जवानाचा मृत्यू; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, पोलिसांनी नातेवाईकांनाच सुनावल्याचा आरोप
मुंबई (प्रतिनिधी) : भिवंडीतील नाशिक महामार्गावरील खड्ड्यात बुलेट आदळून ठाणे टीडीआरएफचे जवान विकास गोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी कुटुंबीयांनी शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, तक्रार नोंदवण्याऐवजी पोलिसांनी उलट नातेवाईकांनाच सुनावल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

मृत जवानाच्या कुटुंबीयांचा दावा आहे की, "तुमच्या मुलालाच खड्डा दिसला नाही का?" असा सवाल पोलिसांनी केला. तसेच ठेकेदारावर कारवाईची मागणी करत असताना मृत जवानावरच गुन्हा दाखल करण्याची भाषा वापरण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, डीवायएसपी विशाल नागरगोजे यांनी या प्रकरणी एडीआर दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. तपासात अपघात खड्ड्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, नातेवाईकांशी गैरवर्तन झाल्याचा आरोपही तपासून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
या प्रकरणाचा पंचनामा, पोस्टमार्टम आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू असून, अपघात पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शींनी पुढे येऊन माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.




