शरद पवारांनी दिलेल्या मेसेजची आठवण; रोहित पवार यांच्याबद्दलही भाष्य

शरद पवारांनी दिलेल्या मेसेजची आठवण;  रोहित पवार यांच्याबद्दलही भाष्य

पुणे (प्रतिनिधी) : राज्यातील दोन मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकांपैकी बारामती विधानसभा मतदारसंघात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीची जाहीर सांगता सभा संपन्न झाली. या सभेत महायुतीमधील सर्वच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी भाषण करताना सुनेत्रा पवार यांना रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी करण्याचं आवाहन केलंय. सभेला सुप्रिया सुळे यांनी सभेला हजेरी लावून अजित दादांची आठवण सांगत त्यांच्या आई म्हणजेच आशा काकींना भेटल्याचं म्हटलं. दरम्यान, सभेत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी भाषण करताना शरद पवारांनी दिलेल्या मेसेजची आठवण सांगत राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबत सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याबद्दलही भाष्य केलं. 

बारामती विधानसभा मतदारसंघासाठी आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. या प्रसंगी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिनिधी म्हणून उदय सामंत आणि रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अजित पवार यांनी जो विक्रम केला होता, तो बारामतीची जनता मोडून सुनेत्रा पवार यांना विजयी करेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. हीच अजित दादांना खरी श्रद्धांजली ठरेल. आम्ही अजित पवार यांच्या पक्षाला सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात पुढे नेण्याचा प्रयत्न करू, असे प्रफुल पटेल यांनी म्हटले. 

मी सुप्रिया सुळे यांना या सभेला येण्याची विनंती केली होती आणि त्यांनी येण्याचे आश्वासन दिले. तसेच, शरद पवार यांनीही स्वतः सांगितले की जर त्यांची तब्येत ठीक नसेल, तर या उन्हाळ्यात बारामतीपर्यंत लांबचा प्रवास करणे योग्य ठरणार नाही. आशीर्वाद देण्याचे त्यांनी सांगितले आणि असेही म्हटले की, सुप्रिया सुळे त्यांच्या प्रतिनिधी म्हणून येथील जनतेला आवाहन करतील. मला वाटते की, शरद पवार यांनी आपल्या प्रकृतीचा विचार करुन प्रवास न करण्याचा योग्य निर्णय घेतला आहे, आणि त्यांचे आशीर्वाद सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी आहेत, असे प्रफुल पटेल यांनी म्हटले. तसेच, जर कोणीही आमच्या नेत्याच्या प्रचारासाठी येत असेल, तर आम्ही त्याचे स्वागत करू. शेवटी, जर कोणी बारामतीतून प्रतिनिधी देण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ प्रचार करत असेल, तर ही चांगली गोष्ट आहे, शेवटी त्या त्यांच्या काकू आहेत, असे म्हणत रोहित पवारांवरही नाव न घेता भाष्य केलं.