चेंबूर दुर्घटनेने मुंबई महापालिका सभागृह भावूक;विहानला श्रद्धांजली, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
मुंबई (प्रतिनिधी) : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या चिमुकल्या विहान श्रीवास्तव याला आज मुंबई महापालिकेच्या स्टँडिंग समितीच्या सभागृहात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी सदस्यांनी दोन मिनिटे मौन पाळून विहानला श्रद्धांजली वाहिली. या घटनेचा उल्लेख करताना अनेक नगरसेवक भावूक झाले.

दुर्घटनेबाबत बोलताना विविध पक्षांच्या नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. चेंबूरमधील अपघाताची सखोल चौकशी होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणी सभागृह नेते गणेश खणकर यांनी केली. तसेच, या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचीही त्यांनी मागणी केली.दरम्यान, चेंबूरमधील घटनेनंतर काही तासांतच अंधेरी पश्चिमेतील आरटीओ कार्यालयाजवळ मोठे गुलमोहराचे झाड रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली आणि वाहनांच्या रांगा लागल्या. सुदैवाने झाडाखाली कोणतेही वाहन किंवा पादचारी नसल्याने जीवितहानी टळली.
घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे कर्मचारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी झाड हटवून वाहतूक सुरळीत केली. सलग घडणाऱ्या झाड कोसळण्याच्या घटनांमुळे मुंबईतील धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पावसाळ्यात अशा झाडांची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.




