लोकप्रतिनिधींचा काजू-बादामावर ताव; मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले, म्हणाले…
नांदेडमध्ये दुष्काळी परिस्थितीवर चर्चा सुरू असताना काही लोकप्रतिनिधी काजू-बादाम खात असल्याचा व्हिडीओ समोर आला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी प्रशासनाला अशा गोष्टी टाळण्याच्या सूचना दिल्या.

मुख्यमंत्री म्हणाले की, एखादी बैठक आयोजित केली जाते तेव्हा प्रशासनाकडून काजू-बादाम यांसारखे पदार्थ देण्याची पद्धत आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता प्रशासनाने अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. कोणीही हे जाणीवपूर्वक करत नाही, तसेच दुष्काळ असल्यामुळे कोणी काजू-बादाम खात नाही. मात्र, अशा प्रकारच्या गोष्टी टाळणे योग्य ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबतही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. ज्या भागात पाणी उपलब्ध आहे, तिथे रब्बी हंगामाचे नियोजन केले जाणार आहे. काही भागात मात्र मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. मोठ्या धरणांमध्ये सध्या पाणीसाठा उपलब्ध असला तरी मराठवाड्यातील छोट्या धरणांमध्ये पाणी कमी आहे. त्यामुळे मोठ्या धरणातील पाणी सध्या राखून ठेवण्यात आले असून, पुढील अंदाज आल्यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
पावसाने खंड दिल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये पिकांचे नुकसान होत आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यात जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर सविस्तर चर्चा झाली असून, पुढील आठवडाभरात प्राथमिक आढावा घेतला जाईल. त्यानंतर पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
शेतकऱ्यांना अतिरिक्त वीज देणार
शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याबरोबरच पिण्याचे पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अल निनोच्या संकटाचा अंदाज असल्याने यापूर्वीच वैरण विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. गरज असलेल्या भागात चारा उपलब्ध करून दिला जाईल.
तसेच, ज्या ठिकाणी विहिरींमध्ये पाणी उपलब्ध आहे, तिथे पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त वीज देण्यात येणार आहे. सिंगल फेसिंगमुळे ज्या ठिकाणी वीजपुरवठा मर्यादित होता, तिथेही वीज उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. संध्याकाळच्या वेळेतही वीज देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
कर्जमाफीच्या याद्याही पूर्ण करणार
कर्जमाफीच्या तीन याद्या तयार झाल्या असून, उर्वरित याद्याही तयार केल्या जातील. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळासाठी ठरावीक नियम आणि शासन निर्णय आहेत. त्यांचे पालन केल्यानंतरच एनडीआरएफकडून निधी मिळतो. सरकार या नियमांचे पालन करेल; मात्र त्याआधीही शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत देण्यात येईल. विरोधकांकडून या मुद्द्यावर राजकारण केले जात असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.




