अमित साटमांना भुंकायलाच ठेवलंय; अमित ठाकरे यांचा नागपुरात हल्लाबोल
मुंबई (प्रतिनिधी) : मनसे नेते अमित ठाकरे यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यावर जहरी टीका केली. “अमित साटम यांना भुंकायलाच ठेवलंय. ते काम ते उत्तम करत आहेत. तेच त्यांचं काम आहे,” असा टोला अमित ठाकरे यांनी लगावला. ते नागपुरात बोलत होते.महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष अमित ठाकरे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पाचपावली परिसरातील सिंधू महाविद्यालयाला भेट दिली. मनसे विद्यार्थी सेनेच्या सदस्यता मोहिमेच्या काउंटरला भेट देत त्यांनी सदस्यता नोंदणी प्रक्रियेची माहिती घेतली. यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केलं.

यावेळी अमित साटम यांनी मराठी भाषेवरून राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत अमित ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. राज ठाकरे यांनी आपल्या नातवाला म्हणजेच अमित ठाकरे यांच्या मुलाला बालमोहन विद्यालयात अॅडमिशन घ्यावं आणि मग टीका करावी, असं आव्हान अमित साटम यांनी दिलं होतं. यावर अमित ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
अमित ठाकरे म्हणाले, “अमित साटम यांना भुंकायलाच ठेवलंय. ते काम ते उत्तम करत आहेत. तेच त्यांचं काम आहे. अशा लोकांवर मी काय बोलू? ज्यांना स्वतःच्या भाषेचं, राज्याचं काहीच पडलेलं नाही. अमित साटम म्हणजे तोच ना, जो लोकांच्या मृत्यूवर हसला? लोकांवर झाड पडून, खड्ड्यात पडून मृत्यू झाले, त्यावर तो हसला. तो माणूस ठरवणार का माझा मुलगा कुठल्या शाळेत जायला पाहिजे?”
यावेळी अमित ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची सभासद नोंदणीही झाली. “मी सगळीकडे सभासद नोंदणी करतोय. मुंबई, कल्याण, डोंबिवली, नाशिक झाले आहेत. आज नागपूरला आलोय. कॉलेज पातळीवर काय अडचणी आणि समस्या आहेत, ते जाणून घेतोय. आमच्या वेळी अशी परिस्थिती नव्हती. आज संघटना विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी आहे. कधी काही लागलं तर आम्ही तुमच्या मागे उभे आहोत,” असं अमित ठाकरे म्हणाले.
तसंच, “दुर्दैवाने जिकडे जातोय तिथे सेल्फी काढतात, पण समस्या सांगत नाहीत. मला अडचणी जाणून घ्यायच्या आहेत. मुलीही त्यांच्या अडचणी सांगत नाहीत. मी इकडे वॉशरूमला गेल्यावर खूप घाण दिसली. फोटो काढण्यासाठी मी आहेच. मला अशा तरुणांना भेटायला आवडतं. मी भारावून जातो. माझ्या पाठीवर मुलं बसतात, मला चर्चा करायला आवडते. हा उत्तम दौरा चालला आहे,” असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी अमित ठाकरे यांनी आदिवासी विद्यार्थी आंदोलनावरही भाष्य केलं. “या सरकारला काहीही पडलेलं नाही. गाणी वगैरे सेकंडरी झाली आहेत. आदिवासी विद्यार्थी 14 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. जीआर रद्द झाला आहे. एक कोटी रुपये जाहीर केलेले अजूनपर्यंत आलेले नाहीत,” असं अमित ठाकरे म्हणाले.
“पेपरफुटी होणार नाही, यावर आपण कधी काम सुरू करणार? जेन झी हे खूप शार्प आहेत. जेन झी प्रश्नच विचारत नाहीयत. त्यांना प्रश्न विचारायला दिले तर बाहेरचा दरवाजा दाखवतील. सरकारने विकृत परिस्थिती आणून ठेवली आहे,” अशी टीकाही अमित ठाकरेंनी केली.दरम्यान, अमित ठाकरे यांच्या तळहातावर पत्नी मितालीचं नाव लिहिलेलं दिसलं. याबाबत विचारलं असता अमित ठाकरे म्हणाले, “माझ्या डोक्यात फक्त बायको असते. बाहेर आल्यावर मला वाटलं की नाव काढून घ्यावं, म्हणून मेहंदी काढली.”




