मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी ठरवायचं नाही; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर संतापले
मुंबई (प्रतिनिधी) : 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके आणि एका पोलीस अधिकाऱ्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये शाब्दिक वाद झाल्याची घटना समोर आली आहे. आपल्या निवासस्थानी भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून उद्धट वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत दिपके यांनी संबंधित अधिकाऱ्याला चांगलंच सुनावलं.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, भेटायला येणाऱ्या नागरिकांशी पोलीस अयोग्य पद्धतीने वागत असल्याचा आरोप दिपके यांनी केला.
यावेळी संतप्त होत दिपके म्हणाले, मी कोणाला भेटायचं आणि कोणाला नाही, हे मी ठरवणार. ते मला पोलिसांनी सांगायचं नाही. तसेच, तुम्ही कोणत्या विभागाचे आहात? कोणत्या पोलीस ठाण्याचे आहात? तुमचं पद काय आहे? अशी विचारणा करत त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला जाब विचारला. अखेरीस, "तुम्ही बाहेर जा, असं म्हणत त्यांनी अधिकाऱ्याला घराच्या परिसरातून बाहेर जाण्यास सांगितल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, अभिजीत दिपके यांनी दिल्लीत भारत मंडपम येथे सुरू असलेल्या एका कार्यक्रमात एआय टूलच्या सादरीकरणादरम्यान आपली वैयक्तिक माहिती उघड करण्यात आल्याचा आरोपही केला आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करत, "माझी माहिती वापरण्याची परवानगी कुणी दिली?" असा सवाल केला. तसेच, सरकारी अधिकाऱ्यांसमोर हा प्रकार घडल्याचा दावा करत, अमेरिकन कंपन्यांच्या माध्यमातून सरकार नागरिकांवर पाळत ठेवत आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.




