'केंद्रात या अन् मनुष्यबळ विकास खाते सांभाळा'; मोदींचे फडणवीसांना आमंत्रण, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

'केंद्रात या अन् मनुष्यबळ विकास खाते सांभाळा'; मोदींचे फडणवीसांना आमंत्रण, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

मुंबई: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालयात मोठे बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात येऊन मनुष्यबळ विकास मंत्रालयाची (शिक्षण खात्याची) जबाबदारी स्वीकारण्याची सूचना केली आहे," असा खळबळजनक दावा शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. रविवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

"शिक्षणाला वाळवी लागली, आता उच्चशिक्षित प्रशासकाची गरज"

संजय राऊत म्हणाले, "शिक्षणमंत्र्यांचे खाते हे देशातील तरुणांची भक्कम पिढी घडवणारे खाते आहे. कोट्यवधी तरुणांचे भविष्य यावर अवलंबून असते, परंतु तिथेच वाळवी लागली आहे. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनासमोर मोदी सरकारला माघार घ्यावी लागली. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या मनात एक उच्चशिक्षित, दूरदृष्टीचा आणि चांगला प्रशासक असलेला नेता शिक्षणमंत्री म्हणून हवा आहे. सध्याच्या घडीला देवेंद्र फडणवीस हेच या पदासाठी उत्तम पर्याय आहेत, हे पंतप्रधान मोदींनाही ठाऊक आहे."

राऊतांनी पुढे दावा केला की, "माझ्याकडे असलेल्या पक्क्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात याबाबत चर्चा झाली आहे. मोदींनी फडणवीसांना थेट केंद्रात येऊन पहिल्या पाच महत्त्वाच्या खात्यांमध्ये मोडणाऱ्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाची जबाबदारी घेण्याची सूचना केली आहे."

"महाराष्ट्रात फडणवीसांच्याच पसंतीचा मुख्यमंत्री होणार"

फडणवीस दिल्लीत गेल्यास महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचे काय? यावर बोलताना संजय राऊतांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर टोला लगावला. ते म्हणाले, "भाजपमध्ये सध्या दिल्लीतूनच राज्य करण्याची परंपरा आहे. गुजरात, मध्य प्रदेश किंवा राजस्थानमध्ये त्यांनी अत्यंत अलोकप्रिय आणि कमी कार्यक्षमता असलेल्या नेत्यांना मुख्यमंत्री केले आहे. मात्र, फडणवीसांच्या बाबतीत पंतप्रधान मोदींनी त्यांना एक खास आश्वासन दिले आहे."