'दिल्लीतील दोन गुजरात्यांना हटवा'; मराठी पंतप्रधानावर मोठं वक्तव्य, राजकीय चर्चांना उधाण
मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कराड दौऱ्यात भाजप, महायुती सरकार आणि केंद्रातील नेतृत्वावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंकजा मुंडे आणि सुनेत्रा पवार यांच्याबाबतही महत्त्वाची वक्तव्ये केली. विशेष म्हणजे, "दिल्लीतील दोन गुजरात्यांना हटवा, मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आनंदच," या त्यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

पंकजा मुंडे यांच्या राजकीय भवितव्याबाबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजपमध्ये पक्षासाठी आयुष्य घालवणाऱ्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचा आवाज दाबला जात आहे. पंकजा मुंडे यांच्यावरही सातत्याने अन्याय होत असून, एवढ्या मोठ्या राजकीय कारकिर्दीनंतर त्यांना संन्यासाची भाषा करावी लागत आहे, ही दुर्दैवी बाब आहे. "पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये आल्या तर त्यांना राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची संधी देऊ," असे म्हणत त्यांनी त्यांना जाहीर निमंत्रण दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले, "मराठी माणूस पंतप्रधान झाला तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असेल. मात्र त्यासाठी आधी दिल्लीतील दोन गुजराती नेत्यांना हटवावे लागेल. त्यानंतरच खरा आनंद साजरा करता येईल." त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना अधिक वेग आला आहे.
सुनेत्रा पवार यांच्याबाबत सुरू असलेल्या "गुंगी गुडिया" वादावरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. "माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही एकेकाळी 'गुंगी गुडिया' असे संबोधले जात होते. हा शब्द अपमानास्पद नसून त्याचे राजकारण करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होत आहे," असा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, "सुनेत्रा पवार यांच्याबद्दल काँग्रेसला पूर्ण आदर आहे. त्या गुंगी गुडिया नाहीत. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आपण लढवय्या आहोत, दुर्गा आहोत, झाशीची राणी आहोत, हे सिद्ध करून दाखवावे," अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या छायाचित्राला जोडे मारत आंदोलन केल्याबाबत प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले, "ज्यांना खरोखर जोडे मारायला हवेत, त्यांच्यापर्यंत जाण्याची हिंमत यांच्यात नाही. सत्तेची झूल पांघरून स्वतःला वाघ समजणाऱ्यांनी आधी ती झूल काढावी. मग ते वाघ आहेत की कोल्हे, हे जनतेला दिसेल."
विजय वडेट्टीवार यांच्या या आक्रमक वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. विशेषतः पंकजा मुंडे यांना काँग्रेसमध्ये येण्याची दिलेली खुली ऑफर, देवेंद्र फडणवीस यांच्या पंतप्रधानपदावरील चर्चेवर केलेले भाष्य आणि "दिल्लीतील दोन गुजराती नेत्यां"बाबतचे वक्तव्य यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले असून, आता भाजप आणि महायुतीकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




