विरोधी पक्षाच्या मतदारसंघांना विकासनिधीपासून वंचित ठेवले जाते; आ. कैलास पाटील यांची सरकारवर टीका

विरोधी पक्षाच्या मतदारसंघांना विकासनिधीपासून वंचित ठेवले जाते; आ. कैलास पाटील यांची सरकारवर टीका

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार कैलास पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना विकासनिधी देण्यात दुजाभाव होत असल्याचा आरोप केला आहे. लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा असला तरी त्या मतदारसंघातील जनतेला विकासकामांपासून वंचित ठेवणे लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी म्हटले.

कैलास पाटील म्हणाले की, मंत्रीपदाची शपथ घेताना सर्व नागरिकांशी समान वागणूक देण्याची भावना व्यक्त केली जाते. मात्र, प्रत्यक्षात विरोधी पक्षाच्या आमदार, खासदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना निधी नाकारण्याचे धोरण अवलंबले जात असल्याचा त्यांचा दावा आहे. यामुळे संबंधित मतदारसंघातील नागरिकांनाच फटका बसत असल्याचे त्यांनी नमूद केले.

आपल्या राजकीय प्रवासाबद्दल बोलताना पाटील यांनी सांगितले की, सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या त्यांना शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामुळे राजकारणात मोठी संधी मिळाली. त्यामुळे पक्षाशी आणि शिवसैनिकांशी प्रामाणिक राहणे हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २०२२ मधील राजकीय घडामोडींचा उल्लेख करत त्यांनी पक्ष सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगितले.

सध्याच्या सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना त्यांनी विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना निधी आणि प्रशासकीय सहकार्य मिळणे कठीण झाले असल्याचा आरोप केला. यंत्रणा आणि विकासनिधीच्या माध्यमातून विरोधकांना अडचणीत आणण्याचे धोरण राबवले जात असल्याचेही त्यांनी म्हटले.याशिवाय, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी वैयक्तिक मैत्री असल्याचे सांगताना पाटील म्हणाले की, त्यांच्या अलीकडील निर्णयाची माहिती त्यांना माध्यमांतून मिळाली. पुढील राजकीय भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे निर्देश देतील, त्यानुसारच आपण काम करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.