‘फक्त हिंदूंच्याच सणांना DJ बंदी का?’ प्रवीण दटकेंचा सवाल; संदीप जोशींचा पलटवार, ‘त्यांनी शेण खाल्लं म्हणून आपणही खायचं का?’
मुंबई (प्रतिनिधी) : नागपुरात डीजे बंदीवरून भाजपमध्येच वेगवेगळे सूर उमटताना दिसत आहेत. फक्त हिंदूंच्याच सणांच्या वेळेला डीजे बंदी का? असा सवाल मध्य नागपूरचे भाजप आमदार प्रवीण दटके यांनी उपस्थित केला आहे.पोलीस प्रशासनाने डीजे बंदीसंदर्भात काढलेली अधिसूचना तातडीने मागे घ्यावी आणि ती 1 जानेवारी 2027 पासून सरसकट सर्वांसाठी लागू करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पुढील दोन-तीन दिवसांत दहीहंडीचे उत्सव आहेत. त्यानंतर गणेशोत्सव आणि नवरात्र आहे. अशात 3 सप्टेंबर रोजीच नागपूर पोलिसांना डीजे बंदीची आठवण का झाली? 1 जानेवारीला किंवा इतर धर्मीयांच्या सणांच्या वेळी नागपूर पोलीस कुठे असतात? असा सवाल प्रवीण दटके यांनी केला आहे.दरम्यान, ध्वनी प्रदूषणाचे मोजमाप डेसिबलप्रमाणे होत असेल, तर डीजेवर बंदी लावण्याचे कारण काय? जिथे कुठे ध्वनिक्षेपकाचा वापर होतो, तिथे पोलिसांनी जाऊन डेसिबलप्रमाणे ध्वनी प्रदूषणाचे मोजमाप करावे. मात्र, अशा पद्धतीने सरसकट बंदी लावू नये, असेही आमदार प्रवीण दटके यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नागपुरात डीजे बंदीची सर्वात पहिली मागणी भाजपचेच माजी आमदार संदीप जोशी यांनी केली होती. याची आठवण करून दिल्यानंतर प्रवीण दटके यांनी यावर उत्तर देणे टाळले. विशेष म्हणजे, नागपुरात सर्वात आधी डीजे बंदीची मागणी संदीप जोशी यांनीच केली होती. गुरुवारी, 3 सप्टेंबर रोजी पोलीस आयुक्तांनी डीजे बंदीचे आदेश जारी केल्यानंतर संदीप जोशी यांनी या निर्णयाचे स्वागतही केले. त्यामुळे डीजे बंदीच्या मुद्द्यावरून नागपुरात भाजपमध्येच वेगवेगळे सूर असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, या मुद्द्यावर बोलताना माजी आमदार आणि भाजप नेते संदीप जोशी यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. ‘त्यांनी शेण खाल्लं म्हणून मी पण शेण खाल्लं पाहिजे’, ही भूमिका योग्य नाही, अशी टीका त्यांनी केली.नागपुरात डीजे बंदीची मागणी करणाऱ्या संदीप जोशी यांनी त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रवीण दटके यांच्या डीजे बंदीला विरोध करण्याच्या भूमिकेचा समाचार घेतला आहे.
प्रवीण दटके यांनी ‘फक्त हिंदूंच्याच सणांमध्ये डीजे बंदी का?’ असा प्रश्न उपस्थित करत नागपूर पोलिसांनी जाहीर केलेली डीजे बंदी मागे घ्यावी आणि ती 1 जानेवारी 2027 पासून लागू करावी, अशी मागणी केली होती. यासंदर्भात संदीप जोशी यांना विचारले असता, ‘एखाद्याने शेण खाल्लं म्हणून आपणही शेण खावं’, ही भूमिका अयोग्य असल्याची तीव्र प्रतिक्रिया त्यांनी दिली.
डीजे बंदीसंदर्भातील पोलिसांची अधिसूचना मी बारकाईने वाचली आहे. त्यामध्ये गणेशोत्सव, ताजुद्दीन बाबा उत्सव आणि इतर समाजाच्या कार्यक्रमांनाही 1 नोव्हेंबरपर्यंत बंदी असल्याचे नमूद आहे. आयुक्तांना 60 दिवसांची अधिसूचना काढण्याचे अधिकार असतात. 60 दिवसांनंतर त्यामध्ये पुन्हा दुरुस्ती केली जाईल.
‘एखाद्याने शेण खाल्लं म्हणून आम्हीही शेण खाल्लं पाहिजे’, ही भूमिका मुळातच अयोग्य आहे. प्रवीण दटके हे ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी घेतलेली भूमिका त्यांच्या दृष्टीने योग्य असावी, असेही संदीप जोशी यांनी म्हटले आहे.




