"आदित्य ठाकरेंना केंद्रीय मंत्र्यांचा टोला; 'अनुभवी नेत्यांचा आदर ठेवायला शिका'"

"आदित्य ठाकरेंना केंद्रीय मंत्र्यांचा टोला; 'अनुभवी नेत्यांचा आदर ठेवायला शिका'"

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटातील घडामोडींवर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.आदित्य ठाकरेंबाबत बोलताना जाधव म्हणाले की, त्यांच्या आजूबाजूला स्वतःच्या वयापेक्षा अधिक काळ राजकारण केलेले अनुभवी नेते आहेत. मात्र, त्यांचा योग्य आदर राखला जात नसल्याने पक्षातील नाराजी वाढत असून अनेक नेते आणि कार्यकर्ते साथ सोडत आहेत, असा दावा त्यांनी केला.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना जाधव यांनी त्यांच्या जवळच्या नेत्यांनाही लक्ष्य केलं. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होण्यामागे काही अहंकारी नेत्यांची वागणूक कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला.दरम्यान, पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेची चर्चा सुरू असताना, जाधव यांनी आणखी एक मोठा दावा केला. ओमराजे निंबाळकर यांच्यासह सहा खासदारांनी संसदेत स्वतंत्र गट स्थापन केला असून त्याला लोकसभा अध्यक्षांची मान्यता मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

हे खासदार भविष्यात कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते आमच्या पक्षात येण्याचा निर्णय घेतल्यास त्यांचे स्वागतच असेल, असेही प्रतापराव जाधव यांनी स्पष्ट केले.याशिवाय, गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या 'ऑपरेशन टायगर'वरही त्यांनी भाष्य केले. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या अलीकडील भाषणांमधून त्यांच्या नाराजी आणि हतबलतेची झलक दिसून येते, आणि त्यावरूनच 'ऑपरेशन टायगर' यशस्वी झाल्याचे संकेत मिळतात, असा दावा जाधव यांनी केला.या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, पुढील काही दिवसांत ठाकरे गटातील राजकीय समीकरणे कोणते वळण घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.