परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडी हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडी हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

परभणी (प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात आज एक मोठी दुर्घटना घडली. यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिराचा बांधकामाधीन सभामंडप अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत 30 ते 40 भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

शनिवार असल्याने मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. त्याचवेळी सभामंडपाच्या बांधकामाचे काम सुरू असताना अचानक संपूर्ण रचना कोसळली. मोठा आवाज झाल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक नागरिकांच्या मदतीने ढिगारा हटवून अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात येत असून घटनास्थळी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत.

दरम्यान, पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला आहे. आवश्यक यंत्रसामग्री आणि मदत पथके तात्काळ घटनास्थळी पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आमदार राजेश विटेकर यांनीही प्रशासनाशी संपर्क साधून बचावकार्याला गती देण्याची मागणी केली आहे.सध्या संपूर्ण प्रशासनाचे लक्ष ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यावर केंद्रित असून बचावकार्य वेगाने सुरू आहे.