अर्थमंत्रीपदाच्या चर्चांना जयंत पाटलांचा पूर्णविराम! NDA प्रवेश आणि विलीनीकरणाच्या चर्चेवरही स्पष्ट भूमिका

अर्थमंत्रीपदाच्या चर्चांना जयंत पाटलांचा पूर्णविराम! NDA प्रवेश आणि विलीनीकरणाच्या चर्चेवरही स्पष्ट भूमिका

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याच्या राजकारणात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता जयंत पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे. जयंत पाटील यांना राज्याचे अर्थमंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चांवर त्यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देत या सर्व अफवा असल्याचे सांगितले.गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील, विनोद तावडे, शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लावले जात होते. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस NDA मध्ये जाणार असल्याच्या आणि जयंत पाटील यांना महत्त्वाचे खाते मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

मात्र पंढरपूर येथे बोलताना जयंत पाटील यांनी या सर्व चर्चांचे खंडन केले.NDA कडून आम्हाला कोणतेही निमंत्रण आलेले नाही. आम्ही कुठलेही खाते मागितलेले नाही किंवा कोणतीही चर्चा केलेली नाही. तरीही गेल्या काही दिवसांत माध्यमांनी मला दोन-तीन वेळा अर्थमंत्रीपदाची शपथ दिली, असा टोला त्यांनी लगावला.यासोबतच दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांवरही जयंत पाटील यांनी भाष्य केले. विलीनीकरणाबाबत आमची कोणाशीही चर्चा झालेली नाही. अशा कोणत्याही चर्चा सुरू नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करताना जयंत पाटील म्हणाले की, पक्षाचे सर्व आमदार आणि खासदार शरद पवार यांच्या सोबत असून कार्यकर्त्यांनी कोणताही संभ्रम बाळगण्याची गरज नाही.दरम्यान, लडाखमधील आंदोलनकर्ते सोनम वांगचूक यांच्यावर झालेल्या कारवाईवरही जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नीला त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी देण्याची मागणी केली.

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबतची चर्चा पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.