संजय गांधी उद्यान शुल्कवाढीवर संताप, वन विभागाचा यू-टर्न

संजय गांधी उद्यान शुल्कवाढीवर संताप, वन विभागाचा यू-टर्न

मुंबई (प्रतिनिधी) : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटक सेवांच्या शुल्कात मोठी वाढ करण्याचा प्रस्ताव समोर आला असून, विशेषतः सकाळच्या वेळेत फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांवर मोठा आर्थिक बोजा टाकला जाणार आहे. यामध्ये काही श्रेणीतील शुल्क थेट 348 रुपयांवरून 10 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव असल्याचे कागदपत्रांवरून समोर आलं होतं. ज्यामध्ये वर्षासाठी 383 रुपये आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 45 रुपये तिकिटं आकरण्यात येत होते. मात्र आता ते सर्वसामान्य नागरिकांसाठी 10 हजार तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 हजार करण्यात आल्याचा प्रस्ताव होता. मात्र, या प्रस्तावावरून स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि नियमित मॉर्निंग वॉक करणाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे या दरवाढी विरोधात मनसेने तीव्र विरोध दर्शवत मनसे स्टाईलमध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. 

एकंदरीत, वाढता विरोध लक्षात घेता मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्रस्तावित तिकीट दरवाढीचा निर्णय अखेर स्थगित करण्यात आला आहे. महसूल आणि वन विभागाने काही दिवसांपूर्वी उद्यानातील प्रवेश शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यासोबतच नवीन तिकीट प्रणाली लागू करण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयाच्या अंमलबजावणीला सध्या ब्रेक लावण्यात आला आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या दरवाढीवरून मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचे बघायला मिळालं आहे. दरवाढीच्या विरोधात मनसे नेते नयन कदम यांनी मनसे स्टाईलमध्ये आंदोलन करण्याची थेट धमकी देत प्रशासनाला इशारा दिला होता. मनसेच्या या धमकीनंतर वन विभागाने नवीन दारांवर स्थगिती देत निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मॉर्निंग वॉक पासच्या दरात वाढ झाल्याची माहिती मिळताच मनसे नेते नयन कदम कार्यकर्त्यांसह थेट वन विभागाच्या कार्यालयात पोहोचून अधिकाऱ्यांना भेटले होते. यावेळी दरवाढीविरोधात भूमिका बजावली आणि दर का वाढवण्यात आला असा जाब विचारण्यात आला. त्यानंतर आता प्रशासनाने निर्णयाला स्थगिती दिल्याची माहिती आहे.

प्रशासनाच्या मते, उद्यानातील वाढते व्यवस्थापन खर्च, देखभाल, सुरक्षा, स्वच्छता आणि सुविधा सुधारणा यासाठी ही शुल्कवाढ आवश्यक आहे. तसेच ऑनलाइन तिकीट प्रणाली लागू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे पर्यटकांना सुलभता मिळेल, असा दावा करण्यात आला. मात्र, या प्रस्तावावरून स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि नियमित मॉर्निंग वॉक करणाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. “सार्वजनिक उद्यानात फिरण्यासाठी एवढे जास्त शुल्क आकारणे योग्य नाही,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहे. परिणामी नागरिकांनी विरोध केल्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.