भरचौकात गोळ्या झाडून हत्या, 20 वर्षांनंतर न्यायालयाचा फैसला

भरचौकात गोळ्या झाडून हत्या, 20 वर्षांनंतर न्यायालयाचा फैसला

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल आज, 20 जून रोजी मुंबई सत्र न्यायालयात जाहीर होणार आहे. तब्बल दोन दशकांपासून सुरू असलेल्या या खटल्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.मूळतः या प्रकरणाचा निकाल 16 जून रोजी अपेक्षित होता. मात्र निकाल तयार करण्यासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे सांगत न्यायालयाने तो पुढे ढकलला होता. त्यामुळे आजचा दिवस या बहुचर्चित खटल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर हे मुंबईहून उस्मानाबादकडे जात असताना नवी मुंबईतील कळंबोली परिसरात त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. दोन हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग करून गोळीबार केला. या हल्ल्यात पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांचा मृत्यू झाला.या प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण नऊ जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, राजकीय वैरातून 25 लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणण्यात आली. पद्मसिंह पाटील यांच्यावर या कटाचे प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप आहे.

आरोपींमध्ये मोहन शुक्ला, कैलास यादव, शशीकांत कुलकर्णी, सतीश मंदाडे, पारसमल जैन तसेच कथित शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटू पांडे यांचा समावेश आहे. पद्मसिंह पाटील सप्टेंबर 2009 पासून जामिनावर आहेत.विशेष म्हणजे, पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर हे नातेवाईक असूनही त्यांच्यातील राजकीय संघर्ष अनेक वर्षांपासून चर्चेत होता. या वैरातूनच हत्येचा कट रचल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे.

सुरुवातीला या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडे होता. मात्र तपासाबाबत आक्षेप घेतल्यानंतर पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नीच्या मागणीनुसार हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला.आता 20 वर्षांनंतर न्यायालय काय निर्णय देते, आरोपी दोषी ठरतात की निर्दोष सुटतात, याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.